Dr. Gopalrao Patil Passes Away: समाजसेवा, वैद्यकीय क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान देणारे माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचं मंगळवारी सकाळी निधन झालं. गेल्या पंधरा दिवसांपासून ते आजारी होते. लातूरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात हळहळ व्यक्त होत आहे.
३ ऑक्टोबर १९३१ रोजी धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कवठा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी एमबीबीएस आणि डीसीएच पदवी ओस्मानिया विद्यापीठातून पूर्ण केली. बालरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी लातूरमध्ये दीर्घकाळ सेवा दिली.
१९६५ साली त्यांनी लातूरमध्ये खाजगी प्रॅक्टिस सुरू केली. त्याचबरोबर मुरुड परिसरात १२ वर्षे विनामूल्य वैद्यकीय सेवा देऊन त्यांनी समाजात विशेष स्थान मिळवलं. त्यांच्या या कार्यामुळे लोक त्यांना ‘देवमाणूस’ म्हणून संबोधत.
डॉ. पाटील हे शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी इंडियन पेडियाट्रिक असोसिएशनची शाखा स्थापन करून तिचे पहिले अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. तसेच अनेक राष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. १९९८ साली त्यांना ‘सर्वोत्कृष्ट डॉक्टर संसदपटू’ हा सन्मान मिळाला होता.
डॉ. गोपाळराव पाटील यांनी १९९४ ते २००० या कालावधीत राज्यसभेचे सदस्य म्हणून काम पाहिलं. त्यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे आदी महत्त्वाच्या संसदीय समित्यांवर काम केलं.
तसेच त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात लोकसभा निवडणूकही लढवली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई पाटील, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यांचा मुलगा सच्चिदानंद अमेरिकेत आयटी कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. मुलीही विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
डॉ. पाटील यांना वाचन, प्रवास आणि गझलांचा विशेष छंद होता. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत आणि फ्रेंच या भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. आयुष्यभर शिकण्याची वृत्ती आणि लोकांशी जुळवून घेण्याची कला यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांना भावलं. त्यांच्यावर आज सायंकाळी ५ वाजता लातूरमधील संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.