Finally, relief for housing scheme beneficiaries with an increased installment
उदगीर : 'घर पूर्ण; वाढीव हप्ता गायब! उदगीरमध्ये १ हजार १०९ घरकुलधारकांची फरपट' या मथळ्याखाली दैनिक पुढारीने ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीचा परिणाम झाला आहे. अखेर उदगीर तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वाढीव ५० हजार रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
दुष्काळाच्या झळा सोसत अनेक लाभार्थ्यांनी सावकारांकडून व्याजाने कर्ज घेऊन घरांचे बांधकाम पूर्ण केले. मात्र, शासनाने जाहीर केलेला वाढीव हप्ता तीन ते चार महिने उलटूनही मिळत नसल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले होते. पंचायत समितीपासून जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत चकरा मारूनही त्यांच्या पदरी निराशाच पडत होती. दैनिक पुढारीने हा प्रश्न सातत्याने मांडत लाभार्थ्यांची व्यथा प्रशासनासमोर आणली.
बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने दखल घेत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या हालचाली सुरू केल्या. जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी संबंधित यंत्रणेला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वाढीव हप्त्याची रक्कम जमा होऊ लागली आहे. दुष्काळी परिस्थितीत या रकमेमुळे कर्जाचा बोजा कमी करण्यास मदत होणार असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दैनिक पुढारीने प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल लाभार्थ्यांनी आभार व्यक्त केले. उर्वरित लाभार्थ्यांचे हप्ते जमा करण्याची कार्यवाहीही सुरू असल्याचे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले.
प्रा. दिलीप मटके यांचाही पाठपुरावा
दैनिक पुढारीत बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रा. दिलीप मटके यांनीही या प्रश्नावर आवाज उठवला, त्यांनी प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी आणि संबंधित अभियंत्यांना जाब विचारत, दुष्काळात कर्ज काढून घरे बांधणाऱ्या लाभार्थ्यांना हप्ता देण्यास विलंब का होत आहे, असा सवाल केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर प्रलंबित फाईल्स निकाली काढण्याच्या प्रक्रियेला वेग आला. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वाढीव हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली. उर्वरित लाभार्थ्यांचे हप्तेही लवकर जमा करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले.