औसा : पोळा सणानिमित्त बैल सजावटीच्या साहित्याने सजलेली दुकाने; मात्र दुष्काळाच्या सावटामुळे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी नाही. Pudhari
लातूर

Bail Pola | बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट; दुकाने सजली, पण ग्राहकच नाहीत

दीड महिन्यापासून पावसाची दडी; खरीप पिके करपली, शेतकऱ्यांच्या उत्साहावर पाणी

पुढारी वृत्तसेवा

Ausa Bail Pola Market

औसा : वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाचा सण म्हणजे बैलपोळा! काळ्या आईची मशागत करताना खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र, यंदा या आनंदाच्या सणावरच दुष्काळाचे काळेकुट्ट सावट पसरले आहे. दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने हजारो हेक्टरवरील खरीप पिके करपली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोळ्याच्या दोन दिवस आधीही बाजारपेठेत बैल सजावटीच्या साहित्याची दुकाने सजली असली, तरी ग्राहक मात्र गायब असल्याचे चित्र औसा शहरात दिसून येत आहे.

पेरणीनंतर झालेल्या तुरळक पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप पिके उभी केली. मात्र, त्यानंतर पावसाने तब्बल दीड महिन्याची उघडीप दिल्याने रानातील पिकांनी माना टाकल्या आहेत. माळरानावरील पिके करपून गेली असून अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजाने उभ्या पिकांवर नांगर फिरवला आहे. उडीद, मूग हातचे गेले असून सोयाबीन आणि तुरीच्या उत्पादनावरही संकट घोंघावत आहे.

बैलांना अंघोळ घालायलाही पाणी नाही!

पोळ्याच्या दिवशी सर्जा-राजाला नदी, नाल्यांमध्ये नेऊन आंघोळ घालणे, त्याची शिंगे रंगवणे, अंगावर झूल चढवणे, घुंगरमाळा बांधणे आणि सजवून मिरवणूक काढणे, अशी ग्रामीण भागातील परंपरा आहे. मात्र, यंदा नदी-नाले, तलाव आणि जलसाठे कोरडे पडल्याने बैलांना धुण्यासाठीही पाणी उपलब्ध नाही. एवढेच नव्हे, तर दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने बांधावरचे हिरवे गवतही संपले आहे. त्यामुळे अन्न-पाण्याची चिंता आणि पोळ्याच्या सणाचा खर्च, अशा दुहेरी कोंडीत शेतकरी सापडला आहे.

उसने-व्याजाने पैसा आणला; आता सण कसा साजरा करायचा?

यंदा पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी उसने किंवा व्याजाने पैसे उभे केले. पिके चांगली येतील आणि कर्ज फेडता येईल, अशी आशा होती. मात्र, पावसाने ऐन हंगामात दडी मारल्याने ही आशाही मावळली आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि डोळ्यासमोर करपलेली पिके असताना पोळ्याचा सण उत्साहात साजरा करायचा तरी कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

साहित्याचे भाव वाढले; खरेदीला शेतकरी फिरकेनात

बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या झुली, मोरक्या, मटाट्या, ऑइलपेंट, विविध रंग, चंगाळ्या (घुंगरमाळा) आदी साहित्याने बाजारपेठ सजली आहे. मात्र, साहित्याच्या किमती वाढल्याने आणि हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुकानदारांनी पोळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या अपेक्षेने मांडलेला माल तसाच पडून असल्याचे चित्र आहे.

‘गेल्या वर्षी पोळ्याच्या आठवडाभर आधीपासूनच शेतकरी साहित्य खरेदीसाठी गर्दी करत होते. यंदा मात्र दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पोळा अवघ्या दोन दिवसांवर आला तरी साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची अपेक्षित गर्दी दिसत नाही. शिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वच साहित्याचे भाव वाढले आहेत,’ अशी खंत साहित्य विक्रेते कलप्पा सगरे (औसा) यांनी व्यक्त केली.

वर्षभर शेतकऱ्याच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या मुक्या जीवासाठी एक दिवस आनंदाचा सण साजरा करण्याची शेतकऱ्याची इच्छा असते. मात्र, यंदा करपलेली पिके, कोरडी पडलेली जलसाठे आणि रिकामा खिसा यामुळे त्या आनंदालाही ग्रहण लागले आहे. दुकाने सजली आहेत, बैलांच्या आरासेचे साहित्य तयार आहे; पण शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र सणाचा आनंद नाही. पोळ्याच्या वेशीवरच दुष्काळाने शेतकऱ्याच्या उत्साहाची वात विझवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT