

Latur News: Signs of drought in Ausa Taluka; soybean crops withered
जयपाल ठाकूर
औसा: आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या औसा तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता चिंतेत बदलली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील सोयाबीन करपून जात असून खरीप हंगाम अक्षरशः हातातून निसटण्याची वेळ आली आहे. ऑगस्ट महिन्यात तालुक्यात अवघे तीन दिवस पाऊस झाला. मागील तीन महिन्यांचा विचार करता केवळ १८ दिवस पावसाची नोंद झाली असून, त्यानंतर तब्बल २५ दिवसांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने पिकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
औसा तालुक्यात खरीप हंगामात मोठ्या क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. त्यापैकी तब्बल २६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. विशेषतः सोयाबीनला शेंगा भरण्याच्या काळात पावसाची नितांत गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने अनेक शेतांतील पिके सुकून गेली आहेत. शेतात डोलणारी हिरवीगार सोयाबीन आता पिवळी पडली असून पाने वाळली आहेत. काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. डोळ्यांसमोर उभे पीक करपत असताना शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टावरही पाणी फिरण्याची वेळ आली आहे. पिकांचे नुकसान एवढ्यावरच थांबणारे नाही.
पावसाची अशीच स्थिती कायम राहिल्यास औसा तालुक्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नदी, नाले, तलाव आणि प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नसल्याने आगामी काळात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि चारा हे प्रश्न आ वासून उभे राहण्याची भीती आहे.
आज पिकांसाठी पाण्याची चिंता आहे; उद्या माणसांच्या घशासाठी पाणी आणि गुराढोरांच्या जगण्यासाठी चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला तर परिस्थिती किती भयावह असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. शेतकऱ्याने कर्ज काढून बियाणे, खते, औषधे घेतली. पेरणीपासून मशागतीपर्यंत हजारो रुपये खर्च केले.
चांगला पाऊस पडेल, भरघोस उत्पादन मिळेल, कर्ज फेडता येईल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागेल, घरातील रखडलेली कामे पूर्ण होतील, अशी अनेक स्वप्ने त्याने यंदाच्या खरीप हंगामावर रंगवली होती. मात्र, पावसाने दगा दिला आणि शेतक-याच्या या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर होण्याची वेळ आली आहे. शेतात पीक उभे असले तरी त्यात जीव राहिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात उत्पादनाऐवजी आता नुकसानीचे आकडे आणि वाढत्या कर्जाची चिंता उरण्याची भीती आहे.
पंचनामे नकोत, तातडीची मदत हवी !
शेतकरी संकटात असताना केवळ पंचनामे, बैठका आणि कागदी अहवालांपुरते प्रशासन मर्यादित राहू नये. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करून तातडीने पीक नुकसानीचे सर्वेक्षण करावे, पीकविमा व शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. करपलेली सोयाबीनची ही शेतं केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नाही; ती संपूर्ण औसा तालुक्यावर येऊ घातलेल्या संकटाची चाहूल आहे. आता तरी शासनाने कागदावरील आकडे बाजूला ठेवून शेतातील वास्तव पाहावे. आज पिके वाचविण्याची वेळ आहे; उद्या पाणी, चारा आणि जनावरांचे प्रश्न उभे राहिल्यानंतर जागे होऊन उपयोग होणार नाही. त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.