Crime News: Six more accused added in assault case
लातूर, पुढारी वृत्तसेवा: रेणापूर तालुक्यातील खारोळा येथील अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणात समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे लातूर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, आणखी सहा जणांचा आरोपी म्हणून समावेश केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता आठ झाली आहे. सचिन राऊतराव, संतोष राऊतराव, बबलू काळे, नितीन शिंदे, दत्ता जाधव, बालू सूर्यवंशी, गणेश भोपी आणि दर्शन भोपी अशी त्यांची नावे आहेत.
फिर्यादीचा पुरवणी जबाब, साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक विश्लेषण आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे उपरोक्तांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासानुसार आरोपींनी अल्पवयीन मुलांना पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीला लिंबाच्या झाडाला, तर त्याच्या दोन मित्रांना शेडच्या खांबाला दोरीने बांधून शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेचा व्हिडिओ चित्रीत करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने आणि पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वाखाली चोरी व मारहाण या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू असून, तपासात दोषी आढळणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.