भाजप निवडणूक प्रभारी शिवेंद्रराजेंचा धूमधडाका File Photo
लातूर

भाजप निवडणूक प्रभारी शिवेंद्रराजेंचा धूमधडाका

सातारा, लातूर जिल्ह्यात अभूतपूर्व कामगिरी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

पुढारी वृत्तसेवा

BJP election in-charge Shivendra Raje was praised.

हरिश पाटणे

लातूर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व छत्रपती घराण्याचे वंशज ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा व लातूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रभारी म्हणून धूमधडाकाच केला. दोन्हीही जिल्ह्यात भाजपने अभूतपूर्व कामगिरी केल्याने राज्य भाजपमध्ये शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाचे वजन वाढले आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित अशी कामगिरी शिवेंद्रराजेंनी केल्याने शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव होत 'लंबी रेसका घोडा' असतील, असेच संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही शिवेंद्रराजेंच्या शब्दाला त्यामुळे पक्षात वजन प्राप्त होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी दिल्यानंतर शिवेंद्रराजेंनी भाजपच्या भूमिकेला प्राधान्य देत सातारा नगरपालिकेत स्थानिक आघाड्यांऐवजी भाजपच्या तिकिटावर उमेदवार उभे केले. उदयनराजेंशी मनोमिलन घडवत त्यांनी पक्षाला प्राधान्य दिले. सातारा नगरपालिकेत अमोल मोहितेंना नगराध्यक्ष करताना विक्रमी मतांनी निवडून आणले.

एवढेच नव्हे तर अन्य कुणीही प्रचारात नसताना शिवेंद्रराजेंनी एकहाती भाजपचे ४० नगरसेवक निवडून आणले. सातारा जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून शिवेंद्रराजेंकडे पक्षाने जबाबदारी दिली. शिवेंद्रराजेंनीही वाई, रहिमतपूर या नगरपालिकांमध्ये तर मेढा नगरपंचायतीमध्ये लक्ष घालून तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आणण्यात मोठा वाटा उचलला. वाई, रहिमतपूर, मेढ्यात त्यांच्या जंगी सभाही झाल्या. मलकापूरलाही शिवेंद्रराजेंनी अतुल भोसलेंना मदत केली तर कराडमध्येही त्यांनी भाजपसाठी अतुल भोसले यांना सहकार्य केले. पूर्वीच्या काळी शिवेंद्रराजे सातारा हा आपला मतदार संघ सोडून अन्यत्र लक्ष घालत नव्हते.

मात्र, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवेंद्रराजेंनी अन्य मतदार संघात लक्ष घालत विविध ठिकाणचे हिशेबही चुकते केले. त्यामुळे सातारा जिल्ह्यात सात नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता आली. त्यात शिवेंद्रराजेंचा वाटा बहुतांश नगरपालिकांमध्ये महत्वाचा ठरला.

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवेंद्रराजेंनी लातूरमध्येही भाजपचे कमळ फुलवले. काँग्रेसच्या वर्चस्वाला शह देत शिवेंद्रराजेंनी लातूरचे पालकमंत्री म्हणून लातूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्येही लक्षणीय कामगिरी बजावली आहे. लातूर जिल्ह्यात शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली ५ नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यात ४ नगरपालिकांमध्ये भाजपचे कमळ फुलले. उदगिर, अहमदपूर, निलंगा व रेणापूर या नगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवले. भाजपच्या निवडणुकीचे प्रभारी म्हणून काम करणाऱ्या शिवेंद्रराजेंनी पक्षहिताला प्राधान्य देत देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेली कामगिरी करून दाखवल्याने भाजपच्या वर्तुळात शिवेंद्रराजेंचे वजन वाढले आहे. पक्षनेतृत्वानेही शिवेंद्रराजेंना शाबासकी दिली आहे.

मुलीच्या लग्नापेक्षाही कार्यकर्त्यांच्या प्रचारात शिवेंद्रराजेंची 'बाप' भूमिका कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात स्वतःच्या मुलांचे लग्न हा महत्त्वाचा विषय असतो. मात्र, शिवेंद्रराजेंनी मुलीच्या लग्नाला जेवढा वेळ दिला नाही त्यापेक्षा जास्त वेळ कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी दिला. सततच्या दौऱ्यांनी शिवेंद्रराजे आजारीही पडले. मात्र, रात्री-अपरात्री ज्या कार्यकर्त्यांनी शिवेंद्रराजेंसाठी रात्रीचा दिवस केला त्या कार्यकर्त्यांवर जेव्हा वेळ आली तेव्हा शिवेंद्रराजेंनीही आपले घरचे कार्य बाजूला ठेवत कार्यकर्त्यांच्या कार्याला प्राधान्य देऊन राजकारणातील बापपणाची भूमिका बजावली. त्यामुळेच विक्रमी विजयानंतर सुरूचि बंगल्यावर कार्यकर्ते शिवेंद्रराजेंच्या गळ्यात गळा टाकून आनंदाने ढसाढसा रडले.

अखेर वेदांतिकाराजेंना नगरपालिकेचा गुलाल लागला

आठ वर्षापूर्वी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवेंद्रराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांचा पराभव झाला होता. त्या दिवसापासून शिवेंद्रराजे कमालीचे व्यथित होते. पत्नीच्या पराभवानंतर शिवेंद्रराजेंच्या राजकीय रणनितीतही बदल झाला. शत्रू असो अथवा मित्र राजकारणात सहसा विश्वास ठेवायचा नाही हे पक्के लक्षात ठेवून शिवेंद्रराजेंनी गेल्या आठ वर्षांत स्वतः मध्ये प्रचंड बदल केले. त्याचीच परिणिती सातारा नगरपालिकेतील निवडणुकीत दिसली. त्यांनी रचलेले आडाखे यशस्वी झाले. अमोल मोहिते यांना चाणक्यनितीने नगराध्यक्ष करून शिवेंद्रराजेंनी सुरूचिवर पुन्हा एकदा नगरपालिकेचा गुलाल आणला. वेदांतिकाराजे या आवर्जुन अमोल मोहिते आणि विजयी नगरसेवकांच्या गुलालात दिसल्या. तेव्हा शिवेंद्रराजेंनाही आठ वर्षापूर्वी झालेल्या पराभवाची जखम पुसल्याचे समाधान लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT