लातूरच्या महापौरांना भाजप नगरसेवकांचा घेराव file photo
लातूर

Latur News : लातूरच्या महापौरांना भाजप नगरसेवकांचा घेराव

विकासकामांना गती न मिळाल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

BJP corporators gherao Latur Mayor

लातूर, पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता स्थापन होऊन तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला असतानाही शहराच्या विकासासाठी ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देविदास काळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला. शहरातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास अधिक आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

भाजपच्या मते, सत्ताधारी काँग्रेसकडून विकासकामांबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसून सुरू असलेल्या काही कामांनाही स्थगिती देण्यात आली आहे. प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा नियंत्रण नसल्याने अधिकाऱ्यांची मनमानी वाढली असून त्याचा फटका नागरिकांना बसत असल्याचा आरोप करण्यात आला.

शहरात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार भाजपने केली. तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नियोजन होत असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

मोकाट कुत्रे व जनावरांच्या समस्येकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती रखडली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी नगरसेवकांनी केलेल्या मुरूमाच्या मागण्याही पूर्ण होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.

शहरातील मूलभूत सुविधा आणि विकासकामे तातडीने मार्गी लावावीत, अन्यथा जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT