धाराशिव ( लातूर ) : बार्शी तालुक्यातील भातंबरा ते बोरफळ या राज्यमार्गाच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
वारंवार होणारे अपघात आणि खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अनेक आंदोलने केली होती. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने आता ही अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे शहरातील जिजाऊ चौक (बार्शी नाका) ते सांजा चौक रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली आहे.
भातंबरा ते बोरफळ या सुमारे ५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर गेल्या दोन वर्षांपासून खड्डेच खड्डे होते. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. शालेय विद्यार्थ्यांना दररोज या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती. या खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले, ज्यात काही तरुणांनी आपला जीवही गमावला.
त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी जोर धरत होती. शिवसेनेचे आंदोलन आणि प्रशासनाची दखल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सातत्याने आंदोलने केली. काही दिवसांपूर्वीच आर. पी. कॉलेजसमोर रास्ता रोको आंदोलन करून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पावले उचलली. बार्शी नाका येथील जिजाऊ चौक ते सांजा चौक या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. मागील दोन दिवसांपासून अनेक व्यावसायिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली होती. मंगळव ारी, सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या मदतीने जी अतिक्रमणे काढली नव्हती ती हटवण्यास सुरुवात केली. यामुळे बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता प्रशस्त झाला असून वाहतूक कोंडीची समस्याही कमी झाली आहे. अतिक्रमणे हटवल्यामुळे रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, असे संकेत मिळत आहेत. भातंबरा ते बोरफळ हा राज्यमार्ग - 'हायब्रीड ऍन्युइटी मॉडेल' अंतर्गत विकसित केला जात आहे. या नवीन कामात शहरातील रस्त्याची रुंदी २४ फूट असणार आहे,
ज्यामुळे वाहतूक सुरळीत व विनाअडथळा होण्यास मदत होईल. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारेही बांधली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला यामुळे वेग आला आहे. या रस्त्याचे हस्तांतरण महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाकडे करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, त्यामुळे हे काम गतीने सुरू आहे. मंगळवारीही अनेक व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे उतरवून घेण्याचे काम सुरू ठेवले होते, ज्यामुळे प्रशासनाला सहकार्य मिळत आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रवास सुरक्षित आणि सुखकर होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.