

Sambhajinagar new water supply plan
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहरात सुमारे १ हजार ९०० किलोमीटर अंतरात अंतर्गत पाणी वितरणाच्या जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. या कामासाठी जीव्हीपीआरने उप कंत्राटदार नियुक्त केले. परंतु हे कंत्राटदार जलवाहिनी टाकण्यासाठी जे खड्डे खोदत आहेत, त्यामुळे अनेकांची नळ कनेक्शन तोडली जात असून, काम पूर्ण झाल्यावर नळ कनेक्शन न जोडताच कंत्राटदार निघून जात आहे. तेव्हा हे नळ कनेक्शन जोडणार कोण, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
शहरातील जलकुंभांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्यासह नागरिक वसाहतींना पाणीपुरवठ्याच्या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी जीव्हीपीआरला महापालिकेने परवानगी दिली असून, या परवानगीवरच जीव्हीपीआर कंपनीने या कामासाठी उपकंत्राटदार नियुक्त केले आहेत. मात्र या कामासाठी जे खड़े वसाहतींमध्ये खोदले जात आहेत. या कामादरम्यान ज्यांची परवानगीची नळकनेक्शन तोडण्यात येतात. त्यांचे नळ कनेक्शन कंत्राटदाराने स्वखचनि पुन्हा जोडून देणे आवश्यक आहे. तसे आदेशातच महापालिकेने नमूद केले आहे.
दरम्यान महापालिकेचे असे आदेश असतांनाही जीव्हीपीआरचे उपकंत्राटदार नागरिकांसोबत दादागिरी करीत आहे. ज्यांची नळ कनेक्शन अधिकृत आहेत, त्यांच्याकडून पैसे घेऊन नळ कनेक्शन जोडून दिले जात आहे. टिळकनगर भागात सध्या अशाच प्रकारे वसाहतीतील अनेकांचे नळ कनेक्शन जीव्हीप-आरच्या कंत्राटदाराने तोडले आहेत. त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात असून, त्यामुळे पाण्याची तर नासाडी होत आहेच, शिवाय नागरिकांनाही पाण्याविना राहावे लागत आहे. या प्रकाराकडे महापालिकेनेही दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे.
महापालिकेकडे पैसे भरणा करून रीतसर परवानगी घेऊन नळ कनेक्शन घेतले आहेत. मात्र असे असतानाही महापालिका आमच्या नळांचे संरक्षण करीत नसेल तर आम्ही वर्षाला पाणीपट्टी का भरावी, असा सवाल टिळकनगरच्या नागरिकांतून उपस्थित होत आहे.