लातूर : शासकीय कामकाजानिमित्त शासकीय पदावर असलेल्या पदाधिकारी, अधिकारी यांच्याकडून शासकीय कार्यालय किंवा इमारतीत पत्रकार परीषदेचे आयोजन करणे समजू शकतो. परंतू राजकीय पक्षाची भूमिका आणि कार्यक्रमाची माहीत देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परीषदेचे आयोजन करण्याची ही नवी प्रथा कोणी पाडली? याची परवानगी कोण देत आहे, असा सवाल आमदार अमित देशमुख यांनी खासदार सुनिल तटकरे यांनी लातूर येथे सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून उपस्थित केला.
विधानभवन परिसरात घडलेल्या हाणामारीच्या घटनेनंतर किमान विश्रामगृहाचा राजकीय वापर टाळला असता तर कदाचित ही घटना घडली नसती. भविष्यात राजकीय वापरासाठी शासकीय परीसर उपलब्ध करुन देऊ नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दरम्यान लोकशाही मार्गाने आंदोलन करुन जनतेच्या भावना प्रतिकात्मक पद्धतीने व्यक्त करणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी बेदम मारहाण करणे, ही घटना अतिशय दुदैवी असून त्याचा निषेध करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मारहाण करणाऱ्यांना त्वरीत अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आमदार देशमुख यांनी यावेळी केली.
सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन केलेली ही मारहाण लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखअसलेल्या विधानभवनात नुकतीच हाणामारीची घटना घडली. त्यातून कोणताही बोध न घेता सताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये हा प्रकार घडवून आणला. यावरून विद्यमान सरकार आणि सत्ताधारी मंडळीची मानसिकता उघड झाली असल्याचेही टीका आमदार देशमुख यांनी यावेळी केली.