रुग्णवाहिकेचा भाग रस्त्यातच निखळला; युवक काँग्रेसच्या तत्परतेने टळला अनर्थ pudhari photo
लातूर

Latur News : रुग्णवाहिकेचा भाग रस्त्यातच निखळला; युवक काँग्रेसच्या तत्परतेने टळला अनर्थ

धीरज देशमुख यांच्याकडून पदाधिकाऱ्यांचे कौतुक

पुढारी वृत्तसेवा

लातूर : मुरूड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका सेवेच्या हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा महत्त्वाचा भाग चालत्या गाडीतून अचानक निखळून पडला. सुदैवाने, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या संवेदनशील कामगिरीबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांनी युवकांचे विशेष कौतुक केले आहे.

विद्युत धक्का (करंट) लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या एका रुग्णाला पुढील उपचारासाठी मुरूडहून लातूरकडे 108 रुग्णवाहिकेतून नेले जात होते. मात्र, काही अंतरावर जाताच या रुग्णवाहिकेचा एक महत्त्वाचा तांत्रिक भाग अचानक गळून पडला. रुग्णवाहिकेत गंभीर रुग्ण असताना झालेला हा बिघाड जीवघेणा ठरू शकला असता.

यावेळी योगायोगाने घटनास्थळी उपस्थित असलेले युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुकेश सवासे, उपाध्यक्ष सुरज कांबळे आणि समाधान गायकवाड यांनी तत्परता दाखवली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी वेळ न दवडता पत्रकार मनोज जोशी यांच्या मदतीने खासगी रुग्णवाहिका बोलावली आणि रुग्णाला सुरक्षितपणे लातूरच्या रुग्णालयात रवाना केले.

प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह

रुग्णवाहिकेचा भाग रस्त्यात गळून पडणे ही बाब केवळ निष्काळजीपणाची नसून आरोग्य प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारी आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील रुग्णवाहिकांच्या तांत्रिक तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, धिरज देशमुख यांनी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि सर्व रुग्णवाहिकांची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे.

युवकांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि माणुसकी खरोखर कौतुकास्पद आहे. संकटसमयी अशा प्रकारे मदतीला धावून जाणारे युवक समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. प्रशासनाने या तांत्रिक बिघाडाची चौकशी करून तात्काळ उपाययोजना कराव्यात.
धिरज देशमुख, अध्यक्ष, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT