

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत तरुणाईचा फक्त चेहराच पुढे केला जात असल्याचे दिसून येत असून, सोशल मीडिया मोहिमा, युवक मेळावे आणि बैठकींमध्ये युवकांना पुढे केले जात आहे. मात्र तिकीट वाटप, उमेदवारांची अंतिम निवड आणि निवडणूक रणनीती ठरवताना युवकांना निर्णायक स्थान मिळत नसल्याचे वास्तव आहे.
निवडणुकीची सूत्रे आजही जुन्याच अनुभवी व माजी नगरसेवकांच्या हाती असल्याने युवकांचा सहभाग प्रचाराप-रताच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीत युवक निर्णायक ठरणार, असा जोरदार प्रचार सुरू असून, राजकीय पक्षांकडून युवकांच्या सहभागाबाबत मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत.
मात्र प्रत्यक्षात राजकीय घडामोडी पाहता चित्र वेगळेच असल्याचे स्पष्ट होत आहे. तिकीट वाटप, उमेदवारांची अंतिम निवड आणि निवडणूक रणनीती ठरवताना युवकांना बाजूला सारले जात असल्याचे वास्तव आहे. अनेक प्रभागांत पुन्हा तेच पारंपरिक चेहरे मैदानात उतरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, नव्या पिढीला केवळ पोस्टर, घोषणा आणि ऑनलाईन प्रचारासाठी वापरले जात असल्याची खंत युवकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आजही जातीय समीकरणे, आर्थिक ताकद, स्थानिक गटबाजी आणि पक्षांतर्गत दबाव हेच उमेदवारी ठरवणारे प्रमुख घटक असल्याचे मत राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त करण्यात आले आहे. तसेच विकास, रोजगार, पारदर्शकता यासारख्या मुद्द्यांचा उल्लेख जरी होत असला, तरी प्रत्यक्ष निवडणूक व्यवस्थापन जुन्याच पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून युवकांशी थेट संवाद साधल्याचा दावा केला जात असला तरी अनेक बैठका औपचारिक ठरत आहेत. युवकांनी उपस्थित केलेल्या गुंठेवारी, अतिक्रमण, रोजगाराच्या संधी, शिक्षणानंतरची अनिश्चितता अशा प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली जात नसल्याची नाराजी आहे. तसेच प्रश्न विचारले की, उत्तराऐवजी आश्वासनांची पुनरावृत्ती होते, अशी भावना अनेक तरुणांतून व्यक्त करण्यात आली आहे.
युवक निर्णायक ही घोषणा वास्तव ठरणार की केवळ प्रचारापुरती राहणार
दरम्यान, महापालिका निवडणुकीमध्ये शहरात सुमारे २.५३ लाख युवक मतदार आहेत. मात्र यातील मोठ्याप्रमाणात युवकवर्ग मतदानापासून दूर राहतो. त्यामुळे युवकांची संख्या मोठी असली तरी प्रभाव मर्यादित राहत आहे. यंदा मनपा निवडणुकीत युवकांचा उल्लेख मोठ्या प्रमाणावर होत असला तरी प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग अपुरा राहिला आहे. ही निवडणूक नव्या राजकारणाची सुरुवात ठरणार की जुन्याच राजकीय पद्धतींची पुनरावृत्ती, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. मतदानाच्या दिवशीच युवक निर्णायक ही घोषणा वास्तव ठरणार की केवळ प्रचारापुरती राहणार, याचा फैसला होणार आहे.