Latur News : दुष्काळात चारा लागवडीचा पथदर्शी उपक्रम file photo
लातूर

Latur News : दुष्काळात चारा लागवडीचा पथदर्शी उपक्रम

शेतकऱ्यांना खर्चाविना उत्पन्नाची संधी; 'व्हीबी-जी राम जी' योजनेतून पाच हजार हेक्टरवर चारा लागवडीचे उद्दिष्ट

पुढारी वृत्तसेवा

A pilot initiative for fodder cultivation during a drought

लातूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या केवळ ५१ टक्के पाऊस झाल्याने चारा टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पशुधनाला चारा, मजुरांना रोजगार आणि शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 'व्हीबी-जी राम जी' योजनेतून पाच हजार हेक्टर क्षेत्रावर चारा लागवडीचा पथदर्शी उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या संकल्पनेतून महसूल, जिल्हा परिषद, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमात सहभागी होणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना महाबीजचे 'स्पीडफीड' ज्वारीचे बियाणे मोफत देण्यात येणार आहे. तसेच लागवड, सिंचन, आंतरमशागत आणि कापणीच्या कामांतून मजुरी मिळणार आहे. योजनेच्या तरतुदीनुसार हेक्टरी एक लाख २१ हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते.

यात सुमारे ७७ हजार रुपये मजुरीसाठी, तर ४४ हजार रुपये बियाणे आणि अन्य आवश्यक खर्चासाठी प्रस्तावित आहेत. 'स्पीडफीड' ज्वारीची पेरणी केल्यानंतर साधारण ५५ दिवसांत पहिली कापणी करता येते. त्यानंतर ३५ ते ४० दिवसांच्या अंतराने आणखी दोन कापण्या घेता येतात.

त्यामुळे एकाच पेरणीतून तीन वेळा चारा उपलब्ध होऊ शकतो. उत्पादित चारा स्वतःच्या जनावरांसाठी वापरण्याबरोबरच गरजू पशुपालकांना विकून शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळविता येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील गुगल फॉर्मद्वारे ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकाच उपक्रमातून तीन फायदे !

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध करणे, ग्रामीण मजुरांना रोजगार देणे आणि शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देणे, अशी या उपक्रमाची त्रिसूत्री आहे. मोफत बियाणे आणि मजुरीसाठी आर्थिक तरतूद असल्याने पात्र शेतकऱ्यांना चारा लागवडीची संधी मिळणार आहे. स्वतःचे पशुधन नसलेले शेतकरीही चारा विकून उत्पन्न मिळवू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT