A 500-year-old historical inscription has been discovered in Dharashiv.
लातूर, पुढारी वृत्तसेवा : धाराशिव जिल्ह्यातील जागजी (ता. भूम) येथील मध्यवर्ती भागात असलेल्या जकनाई देवीच्या ठाण्याजवळ 500 वर्षे जुना ऐतिहासिक शिलालेख आढळून आला आहे. हा शिलालेख म्हणजे तत्कालीन रस्ता दर्शविणारा ममाईल स्टोनफ (दिशादर्शक) असल्याचे इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे यांच्या संशोधनातून समोर आले आहे.
जागजी गावातील विहीर (आड) व पिंपळाचा पार असलेल्या परिसरात हा शिलालेख आणि एक वीरगळ दुरवस्थेत आढळून आली. इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी या शिलालेखाचा ठसा घेऊन वाचन व संशोधन केले असता, हा निजामकालीन ममाईल स्टोनफ असल्याचे स्पष्ट झाले.
हा शिलालेख फारसी आणि देवनागरी अशा दोन लिपींमध्ये कोरलेला असून, दोन्ही लिपींत एकच मजकूर आहे. सुरुवातीला फारसी लिपी आणि त्याखाली देवनागरी लिपीत 4 ओळींचा मजकूर कोरलेला आहे.
महत्त्वाचा ऐतिहासिक दुवा
नगरच्या निजामशाहीतील शासक बुऱ्हाण निजाम शाह सत्तेवर असताना हा शिलालेख कोरण्यात आला आहे. तत्कालीन रस्ते, गावे आणि दळणवळण व्यवस्था समजून घेण्यासाठी हा शिलालेख अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. फारसी व नागरी लिपीत तो कोरल्याने त्या काळातील भाषाव्यवहाराचीही माहिती होते.