

Chakur Naigaon bar owner murder case
चाकूर : तालुक्यातील नायगाव येथील एका रेस्टोरंट मालकाचा रेस्टोरंटसमोर तीन अज्ञात व्यक्तीने डोक्यात काठी घालून निर्घृण खून केल्याची गंभीर घटना शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर तीन मारेकरी फरार झाले होते. या घटनेमुळे नायगाव व चाकूर परिसरात एकच खळबळ माजली होती.
या घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून आरोपीचा युद्धपातळीवर शोध सुरू करून पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान केली आणि घटनेच्या पाच तासांत तीन जणांना लोहा तालुक्यातील रिसनगाव शिवारातून ताब्यात घेतल्याने चाकूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
नायगाव येथील बी. एन बार अन्ड रेस्टॉरंटमध्ये तीन अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून रेस्टोरंट मालक गजानन नामदेव कासले यांना दारु व सिगारेट दे म्हणून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्या डोक्यात काठीने जबर मारहाण करुन त्याचा खून केला. दरम्यान, अजय भरत मोरे यांच्या डोक्यात त्यांनी शरीरावर काठीने मारहाण करुन गंभीर जखमी करून बारमधील टीव्हीचे नुकसान आणि बारच्या कॅश काउंटर मधील अंदाजित १५ हजार रुपये आणि विदेशी दारुच्या बाटल्यांची जबरी चोरी करून आरोपी पसार झाले होते.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी भेट देवून तपासाला गती देण्याचे काम सुरू केले. रेस्टोरंट परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची आणि प्रत्यक्षदर्शी ठिकाणची पाहणी करून तपासकामी शोध पथके मारेकऱ्याच्या मागावर पाठवली आणि तात्काळ मारोती उर्फ बबलू हरिबा बोयने,सागर हणमंत बोयने आणि संतोष राम तेलंगे सर्व राहणार धवेली तालुका रेणापूर या तीन मारेकऱ्यांना लोहा तालुक्यातील रिसनगाव शिवारातून पाच तासांत ताब्यात घेतले आहे.
या यशस्वी कामगिरीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, पोलीस उपनिरीक्षक पंकज निळकंठे,रमेश चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भुजबळ,पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, अंमलदार दामोदर सिरसाट, शौकत बेग, चंद्रकांत राचमाळे, राजकुमार वाघमारे,विष्णू गुंडरे, सुनिल घोडके, मनोहर काथवटे, हणमंत मस्के, श्रीमंत आरदवाड, नितीन मामडगे, बस्वलिंग चिद्रे, श्रीकृष्ण धडे आदींचा सहभाग होता.
दरम्यान, चाकूर पोलिसांनी तात्काळ आरोपींचा पाच तासात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याची मोठी कारवाई केली आहे. यामुळे चाकूर पोलिसांचे सर्वत्र स्वागत होत आहे.