

Bar owner murdered over anger over not being served alcohol
चाकूर, पुढारी वृत्तसेवा
दारू आणि सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तिघांनी हॉटेल मालकाच्या डोक्यात काठीने मारहाण करून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना चाकूर तालुक्यातील नायगाव येथे घडली. शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, गुन्हा करून पसार झालेल्या तिन्ही आर-ोपींना चाकूर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत लोहा तालुक्यातील रिसनगाव शिवारातून बेड्या ठोकल्या आहेत. गजानन नामदेव कसले (रा. नायगाव) असे मयत हॉटेल मालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव येथे गजानन कसले यांचे बी. एन. बार अँड रेस्टॉरंट आहे. शुक्रवारी रात्री तीन अज्ञात व्यक्तींनी बारमध्ये येऊन कसले यांच्याकडे दारू आणि सिगारेटची मागणी केली. यावेळी झालेल्या वादातून आरोपींनी कसले यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर त्यांच्या डोक्यात काठीने जोरदार प्रहार केला, यात त्यांचा मृत्यू झाला. आरोपींनी केवळ खूनच केला नाही, तर हॉटेलमधील अजय भरत मोरे यांनाही मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच बारमधील टीव्हीची तोडफोड करून काऊंटरमधील १५ हजार रुपये रोकड आणि विदेशी दारूच्या बाटल्या घेऊन पोबारा केला.
सीसीटीव्हीमुळे आरोपी जाळ्यात
हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास पथके रवाना करण्यात आली. आरोपी लोहा तालुक्यातील रिसनगाव शिवारात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून मारोती उर्फ बबलू हरिबा बोयने, सागर हणमंत बोयने आणि संतोष राम तेलंगे (सर्व रा. धवेली, ता. रेणापूर) या तिघांना ताब्यात घेतले.