Latur News : चार महिन्यांत लातूर मंडलातील ३६४ वीजचोरांचा पर्दाफाश file phopto
लातूर

Latur News : चार महिन्यांत लातूर मंडलातील ३६४ वीजचोरांचा पर्दाफाश

३० लाख रुपयांची वीजचोरी उघड, दंडाची रक्कम न भरल्यास गुन्हे दाखल होणार

पुढारी वृत्तसेवा

364 electricity thieves exposed in Latur division in four months

लातूर, पुढारी वृत्तसेवा : वीजहानी कमी करण्याच्या दृष्टीने अतिवीजहानी असलेल्या वीजवाहिन्यावरील वीजचोरी विरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेत लातूर मंडलातील जास्त वीजहानी असलेल्या भागात राबविलेल्या धडक कारवाईत तब्बल ३६४ संशयीत वीजचोरांवर महावितरणच्या पथकाने गेल्या चार महिन्यात दंडात्मक कारवाई करत वीजचोरांचा पर्दाफाश केला आहे.

यात लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांचा समावेश आहे. या सर्व वीजचोरांवर वीज कायद्याच्या कलम १३५ अन्वये दंडात्मक कारवाई करत वीजबिल व दंडाची रक्कम असे एकत्रित एकूण २९ लाख ८५ हजार रुपयांचे देयक देण्यात आले असून दोन लाखांची वसुली करण्यात आली आहे. देयक न भरणाऱ्या ग्राहकांवर विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

महावितरणच्या लातूर मंडलांतर्गत येणाऱ्या लातूर, निलंगा व उदगीर विभागातील संशयीत वीजग्राहकांची पाहणी केली असता एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांच्या विशेष कारवाईत लघुदाब वर्गवारीतील ३६४ वीजग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड करून तसेच विविध मार्गाचा अवलंब करून वीजचोरी केल्याचे आढळून आले. यामध्ये लातूर विभागातील ४१३ वीजग्राहकांची तपासणी केली असता १४८ वीजग्राहकांनी वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. या ग्राहकांना १० लाख ६१ हजार रूपये दंडाचे बील आकारण्यात आले असून १०२ वीजचोरांकडून २ लाख रुपयांची वसूली करण्यात आली आहे. या मोहिमेत निलंगा विभागातील १३६ वीजग्राहकांची तपासणी केली असता १२२ वीजग्राहकांनी वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले.

ग्राहकांना सहा लाख रूपयांचे दंडाचे बील आकारण्यात आले असून ३४ वीजचोरांकडून ४८ हजार रूपयांची वसुली करण्यात आली आहे. त्याचबरोबर उदगीर विभागातील १११ वीजग्राहकांची तपासणी केली असता २४ वीजग्राहकांनी वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले असून, या ग्राहकांना १३ लाख २४ हजार रुपयांचे दंडाचे बिल आकारण्यात आले आहे. तसेच ३५ वीजचोरांकडून २६ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास वीजकायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा महावितरणने दिला आहे.

महावितरणच्यावतीने सातत्याने वीजचोरीविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. यात आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांसह मीटरमध्ये छेडछाड तसेच मीटरला बायपास करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. तसेच कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांनी अनधिकृतपणे वीज वापरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सोबतच अशा वीजग्राहकांना शेजाऱ्यांनी वीजपुरवल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल. वीजचोरी विरोधातील धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी अधिकृत जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT