

Demand to make Latur District Hospital with 500 beds
लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्हा रुग्णालयाचा वाढता रुग्णभार लक्षात घेऊन ते ५०० खाटांचे उभारण्यात यावे, तसेच औसा उपजिल्हा रुग्णालयासाठी ६९ नवीन पदांना मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली. या मागण्यांची दखल घेत मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक प्रस्ताव आणि अंदाजपत्रक तातडीने सादरकरण्याचे निर्देश दिले.
मंत्रालयात सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत लातूर जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी आ. पवार यांनी लातूर शहराची वाढती लोकसंख्या आणि जिल्हा रुग्णालयातील वाढता रुग्णभार लक्षात घेता केवळ १०० खाटांचे रुग्णालय अपुरे पडणार असल्याचे सांगून रुग्णालयाचा विस्तार ५०० खाटांपर्यंत करण्याची मागणी केली.
तसेच सध्या सुरू असलेल्या १०० खाटांच्या इमारतीच्या अंदाजपत्रकात आधुनिक वैद्यकीय सुविधांचा समावेश करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय उर्वरित ४०० खाटांच्या बांधकामासाठी एडीबी निधीअंतर्गत अंदाजपत्रक मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मंत्री आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाचा आढावा घेण्यासह आवश्यक अंदाजपत्रक तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले.
औसा उपजिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि गट 'अ' ते 'ड' संवर्गातील मिळून ६९ नवीन पदांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले. बैठकीत आ. पवार यांनी तालुका आरोग्य अधिकारी (टीएचओ) पदावर अनुभवी एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती कायम ठेवण्याची मागणीही केली. ग्रामीण आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अशा अधिकाऱ्यांचा अनुभव महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
या मागणीला मंत्री आबिटकर यांनी तत्त्वतः सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीला सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाचे सचिव ई. रवींद्रन, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त, लातूरचे जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.