जालना ः शहरातील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मैदानावर आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना नितीन चंदनशिवे.  pudhari photo
जालना

Nitin Chandanshive : युवापिढीने आंबेडकरी विचार आत्मसात करण्याची गरज

डॉ.आंबेडकर व्याख्यानमालेत नितीन चंदनशिवे यांचे मत

पुढारी वृत्तसेवा

जालना ः सोशल मीडियावर व्यस्त राहणारी तरुण पिढी महापुरुषांच्या पुतळ्याजवळ गर्दी करीत असून या तरुण पिढीने परिवर्तनाचे विचार आत्मसात करावे, असे प्रतिपादन विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी येथे केले.

जालना शहरातील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मैदानावर बुधवारपासून सुरू झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे हे अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री राजेश टोपे, भीम कायदा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास डोळसे, सामाजिक कार्यकर्ते सुनील साळवे यांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. विचारपीठावर व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉ. शांताराम रायपुरे, सचिव सुधाकर रतनराव रत्नपारखे, कार्याध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, प्रा. सुभाष देठे आदींची उपस्थिती होती.

आंबेडकरी चळवळ व आजचा तरुण या विषयावर विचार मांडताना चंदनशिवे पुढे म्हणाले की, आज सगळ्याच जाती पेटल्याने भारत व भारतीयत्व हरवले आहे. जातीधर्मापेक्षा मी भारतीय असणे आज गरजेचे आहे. हजारो वर्षांपासून दलित, बहुजन समाज अन्याय अत्याचार सहन करीत आला. त्यांना न्याय देण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. परंतु 14 एप्रिल 1891 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाचा तळपता प्रज्ञा सूर्य उगवला. त्यांनीच सर्व अन्याय अत्याचार गाडून टाकण्याचे काम करीत सर्वांनाच न्याय देण्याचे काम केले.

त्यानंतर आंबेडकरी चळवळ मोठ्या जोमाने वाढली. मात्र आजकालची तरुण मंडळी चळवळीत दिसत नसून ते घरी बसूनच फेसबुक, व्हॉट्सॲप यासारख्या सोशल मीडियावर मग्न झालेले दिसत आहेत. त्यामुळे डिजिटल कट्टरता वाढलेली असून ही धार्मिक रंगांची चळवळ अतिशय घातक आहे. प्रत्येकजण आपापल्या सोयीने भगवा, निळा, पिवळा, हिरवा, लाल व इतर रंगांत शुभ सकाळ,नको ते वादळ असा संदेश पाठवित आहेत. अशा माध्यमातून महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली असून ती गर्दी महापुरुषांच्या पुस्तकाजवळ आणणे गरजेचे असल्याचे चंदनशिवे यावेळी म्हणाले.

आंबेडकरी चळवळीने बहुजन समाजाला खूप काही दिले, जगण्याची दिशा दाखवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक चळवळीमुळे आंबेडकरी समाज बुवाबाजीपासून दूर राहिला आहे, ही बाब उल्लेखनीय आहे. तरण पिढीने शिक्षण घेऊन शहाणे व ज्ञानी व्हावे, महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार आत्मसात करावे, असे आवाहन करत चंदनशिवे यांनी विद्यर्थ्यासमोर कविता सादर केली.

महापुरुषांच्या विचारातून क्रांती

यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, महापुरुषांच्या विचारातून सामाजिक क्रांती झाल्या आहेत, जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला ही महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार समाजात पेरण्याचे कार्य करीत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणुसकी हा धर्म मानला. मानवता, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य ही तत्त्वे अंगीकारली, माणुसकी हाच धर्म मानलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही समाजकारण व राजकारण करीत आलो आहोत. आज धर्मवाद व जातीयवाद शिगेला पोहचला आहे, माणुसकी हा विचार लोप पावत चालला आहे. महापुरुषांच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे, ही बाब समाजासाठी घातक असल्याचे टोपे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT