

डॉ. दीपक शिकारपूर
भारत हा तरुणांचा देश आहे. आपल्या देशातील लोकसंख्येचा मोठा भाग तरुणांचा असल्यामुळे भारताला ‘तरुण भारत’ असेही म्हटले जाते. या तरुणांमध्ये अमाप ऊर्जा, कल्पकता, धाडस आणि बदल घडवण्याची क्षमता आहे. भारतात दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो.
थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून 1985 पासून सर्वत्र साजरा केला जातो. ते एक समाजसुधारक, तत्त्वज्ञानी आणि विचारवंत होते. तरुणांची शाश्वत ऊर्जा जागृत करण्याचा तसेच देशाचा विकास करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. विविध शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये परेड करून स्वामी विवेकानंदांवर भाषण, वक्तृत्व /वादविवाद स्पर्धा, गाणी, निबंध-लेखन स्पर्धा, परिसंवाद इत्यादी साजरे केले जातात. युवा पिढीला बर्याच कल्पनांना सामोरे जाण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्राचा योग्य मार्गाने विकास करण्यासाठी योग्य योजना जोपासण्याची योजना तयार करण्यासाठी राष्ट्रीय युवा दिन ही एक सुवर्णसंधी आहे.
‘विकसित भारतासाठी सक्षम, सर्जनशील आणि मूल्यनिष्ठ युवा’ हे 2026 च्या युवा दिवसाचे घोषवाक्य आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी कौशल्यसंपन्न, नवीन विचार करणारी आणि नैतिक मूल्यांवर चालणारी तरुणाई घडवणे, हाच याचा मुख्य संदेश आहे. तरुणांनी केवळ शिक्षितच नव्हे, तर कौशल्यवान, नवीन कल्पनांनी समृद्ध आणि नैतिक मूल्यांशी निष्ठावान असणे आवश्यक आहे. आजची तरुणाई ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि समाजसेवा या सर्व क्षेत्रांत तरुणांनी पुढाकार घेतला, तर भारत नक्कीच विकसित राष्ट्र बनेल. विकसित भारतासाठी सक्षम, सर्जनशील आणि मूल्यनिष्ठ युवा, सक्षम युवा म्हणजे असा तरुण जो,
* शिक्षणाने सक्षम आहे.
* विविध कौशल्ये शिकलेला आहे.
* आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो.
* शारीरिक आणि मानसिकद़ृष्ट्या तंदुरुस्त आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी पुरेशी नाही. संगणक ज्ञान, संवादकौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, स्वयंरोजगाराची तयारी ही सर्व कौशल्ये तरुणांना सक्षम बनवतात. सक्षम तरुण स्वतःचा विकास करतो आणि इतरांनाही रोजगाराच्या संधी निर्माण करून देतो. असा तरुणच देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देतो.
सर्जनशील युवा म्हणजे
नवीन विचार करणारा, नवकल्पना मांडणारा तरुण.
- हे नेहमी असेच का, असा प्रश्न विचारतो
- नवीन उपाय शोधतो
- विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, उद्योग, कला अशा क्षेत्रांत नावीन्य आणतो
आज भारतात अनेक तरुण नवउद्योग, संशोधन, स्टार्टअप, सामाजिक उपक्रम सुरू करत आहेत. ही सर्जनशीलता भारताला जगात वेगळी ओळख देत आहे. सर्जनशील तरुण समस्येकडे अडचण म्हणून नाही, तर संधी म्हणून पाहतो.
मूल्यनिष्ठ युवा म्हणजे नैतिक मूल्यांवर विश्वास ठेवणारा तरुण.
* प्रामाणिकपणा पाळतो
* शिस्त, कर्तव्य आणि जबाबदारी जपतो
* समाज, कुटुंब आणि देशासाठी विचार करतो
* अन्याय, भ्रष्टाचार आणि हिंसेपासून दूर राहतो
‘विकसित भारतासाठी सक्षम, सर्जनशील आणि मूल्यनिष्ठ युवा’ हे घोषवाक्य तरुणाईला दिशा दाखवणारे आहे. सक्षम कौशल्ये, सर्जनशील विचार आणि मजबूत मूल्ये यांचा संगम झाला, तर भारत नक्कीच उज्ज्वल भविष्यात प्रवेश करेल. आजचा तरुण जागरूक, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ झाला, तर उद्याचा भारत निश्चितच सशक्त, समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनेल.
सध्या युवा पिढीला संभ्रम आहे आणि मोठी समस्या आहे, ती रोजगार व करिअरची. विसाव्या शतकात पदवी म्हणजे यशस्वी करिअर हे समीकरण होते. फार संघर्ष न करता 1990 पर्यंत नोकर्या उपलब्ध होत होत्या. आता ते चित्र पूर्णपणे बदलेले आहे. अनेक द्विपदवीधारकही हजारोंच्या संख्येत बेरोजगार आहेत. शिपायाच्या नोकरीला अनेक पदवीधर अर्ज करतात, ही बाब शैक्षणिक पातळीचे अधःपतन दर्शवते. शिकून नोकरी मिळणार नसेल, तर उच्च शिक्षण का घ्यायचे, हा रास्त प्रश्न युवा पिढी आमच्या पिढीला विचारत आहे.
यावर एकाच उपाय म्हणजे कौशल्यवृद्धी. पदवी+कौशल्य+कार्यानुभव+द़ृष्टिकोन = यशस्वी करिअर हे एकविसाव्या शतकातले समीकरण आहे.
कौशल्य हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. अनेक धुरिणांना कौशल्य म्हणजे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्याची शिक्षण पद्धती असेच वाटते. हीच खरे तर शोकांतिका आहे. तेलाचे साठे सापडल्याने मध्यपूर्व देशांचा विकास झाला. भारताचे खरे भांडवल आहे आपली युवा शक्ती, तीसुद्धा ग्रामीण भागातील. तिच्यावर योग्य संस्कार झाले व कौशल्याची कल्हई दिली, तरच चमकदार व्यक्तिमत्त्व विकसित होईल. वेग, नवकल्पना, मूल्यवर्धन आणि बदल आत्मसात करणे हे आजच्या घडीचे मंत्र आहेत. बुद्धिमत्ता, आकलन शक्ती, व्यवहार ज्ञान, माणुसकी या कुठल्याही बाबीत ग्रामीण युवा शक्ती कमी नाही. अनेक शहरी तरुण/तरुणांनी खरे तर या बाबी ग्रामीण मित्रांकडून शिकल्या पाहिजेत. ग्रामीण युवकांचे प्रश्न अगदी साधे आहेत. आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, कार्यसंस्कृती, वेळ पाळणे व टापटीप या प्रमुख बाबींवर त्यांनी लक्ष दिले पाहिजे. व्यक्तीसापेक्ष अंगभूत कौशल्यांचा विकास करण्याकडे आपण खरोखरीच युद्धपातळीवर लक्ष दिले, तर भविष्यात आपला देश फार वेगळा दिसेल. पुढील दशकामध्ये आपणां सर्वांच्या खासगी तसेच कामाच्या ठिकाणच्या जीवनशैलीत मोठे बदल होणार आहेत. विसाव्या शतकात जे नीतिनियम किंवा धोरणे लागू होती, ती भविष्यकाळात कामास येणार नाहीत. त्यामुळे ‘अनुभवी’ असण्याची संकल्पनाच बदलणार आहे. व्यवहारज्ञान, प्रभावी संवाद साधण्याचे कौशल्य, समूहामध्ये काम करण्याची तयारी व क्षमता या व अशा बाबींना आजच्या तुलनेमध्ये असाधारण महत्त्व येणार आहे. दुर्दैवाने आज या बाबींचे महत्त्व कोणालाही फारसे जाणवत नाही आणि त्यामुळे मुलामुलींना त्या शिकवल्या गेल्या पाहिजेत असेही वाटत नाही. आता एका अतिशय महत्त्वाच्या बाबीकडे मी वळणार आहे, ती म्हणजे आजच्या जमान्यातले मुलींचे आणि महिलांचे स्थान. स्वतःचे विश्व साकार करण्यासाठी सरकारी मदतीवर आणि धोरणांवर अवलंबून न राहणार्या महिलाही आहेत. आयटीने त्यांच्यासाठी एका नव्या विश्वाची दारे उघडली आहेत आणि त्या या संधीचा भरभरून फायदा घेत आहेत. बहुतेक सर्व आयटी कंपन्यांमध्ये महिला कर्मचार्यांची संख्या फार मोठी आहे. कोणत्याही आरक्षणाची मागणी न करताही आयटी आणि बीपीओच्या क्षेत्रात त्यांनी आघाडी मारली आहे. आजच्या वेगळ्या पठडीतल्या, अनेकविध रोजगारांसाठी महिला पुरुषांइतक्याच योग्य आहेत. किंबहुना काही बाबतीत त्या जास्त सरस आहेत. त्या आपले लक्ष दिलेल्या कामावर जास्त चांगल्या प्रकारे केंद्रित करू शकतात (क्रिकेट, राजकारण इ. च्या भानगडीत न पडता). त्यांची नवीन गोष्टी शिकण्याची मानसिक तयारी जास्त असते. आपल्याला जागतिक संधी हव्या असतील, तर व्यावसायिक इंग्रजी व आणखी एका परदेशी भाषेचे शिक्षण घेणे अनिवार्य आहे. यासाठी ई- शिक्षण, वेब, टीव्ही या माध्यमांचा वापर अनिवार्य आहे. याद़ृष्टीने जपान ही सुवर्णसंधी असू शकते. उगवत्या सूर्याचा हा देश भारतीयांचे योगदान जाणतो. जपानचे सरासरी आयुर्मान सत्तरच्या वर असल्याने आपला देश व आपली युवा शक्ती हा धोरणात्मक पर्याय अनेक जपानी विचारवंतांना पटला आहे. गरज आहे ती आपल्या देशातील शिक्षण पद्धतीला व युवा पिढीला पटवून देण्याची. आज विवेकानंद हयात असते, तर ते शिकागोऐवजी टोकियोला गेले असते.