Women's spontaneous response to financial literacy camp
जालना, पुढारी वृत्तसेवाः रोटरी क्लब ऑफ जालनातर्फे सूक्ष्म, लघु व मध्यम महिला उद्योजिकांसाठी रामनगर येथे २६ ते २७ डिसेंबरदरम्यान आयोजित दोन दिवशीय आर्थिक साक्षरता शिबिरात १०० महिलांनी सहभाग नोंदविला. मुंबई येथील श्रीमती पौर्णिमा शिरसकर, श्रीमती सीमा देसाई नायर, श्रीमती सुमन पारेख या तज्ञ मार्गदर्शकांनी यावेळी मार्गदर्शन केले.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रामनगर ग्रामपंचायतचे सरपंच गोपाल मोरे, रोटरी क्लबच्या अध्यक्ष वर्षा वर्षा पित्ती, सचिव लक्ष्मीनिवास मल्लावत, महिला सबलीकरणाच्या संचालिका अर्चना देशपांडे, सुनीती मदान यांच्यासह उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, रामनगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उपस्थित होते.
महिलांची उद्योजकतेसाठी असणारी मानसिकता, व्यवसाय उत्पादनासाठी लागणारे भौगोलिक क्षेत्र, तज्ञ मार्गदर्शन, अर्थसहाय्य उपलब्धता, व्यापारपेठ, विविध शासकीय योजना, अनुदान आदी विषयांवर उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात सहभागी सर्व महिलांना महाराष्ट्र शासन द्वारा एमएसएमई प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या प्रमाणपत्रद्वारे शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळणार आहे. वैविध्यपूर्ण शिबिरामुळे शिविरार्थी महिलांनी समाधान व्यक्त केले. लवकरच त्यांना मुंबई येथे जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख किशोर देशपांडे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार प्रकल्प प्रमुख सचिन वाणी यांनी मानले.