Jalna Water Crisis pudhari photo
जालना

Jalna Water Crisis : जालनेकरांना पावसाची प्रतीक्षा, पाणीप्रश्न गंभीर

३१ तहानलेल्या गावांना प्रशासनाकडून ९६ टँकरव्दारे पाणीपुरवठा

पुढारी वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यात जून महिना संपत आला तरीही समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर रूप घेताना दिसत आहे. जिल्ह्यातील ७ मध्यम व 60 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने प्रशासनासमोर पाणी प्रश्नाचे आव्हान उभे आहे. पिण्याच्या पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेता जिल्ह्यात 31 गावे आणि 32 वाड्यांना तब्बल 96 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जालना जिल्ह्यात आठ तालुके असून साडे नऊशेहून अधिक गावे आहेत. यंदा मान्सूनच्या पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिल्याने जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाण्याचे स्रोत आटण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक विहिरी आणि बोअरवेल्सच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

काही ठिकाणी विहिरी व बोअर कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात जून महिना संपत आला असतांना केवळ २४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.यामुळे जिल्ह्यातील खरीप पेरण्या रखडल्या असून शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील ६० लघु तलावांपैकी ५ तलाव पूर्णपणे कोरडे पडले असून उर्वरित तलावांमधील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. परिणामी अनेक गावांमध्ये टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी वाढत्या उष्णतेमुळे आणि अपुऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिक चिंताजनक बनत आहे.

पाणीटंचाईमुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला नसून शेती, पशुपालन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. आगामी काही दिवसांत चांगला व समाधानकारक पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील पाणीटंचाईची दाहकता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाकडून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत असून उपलब्ध जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांच्या नजरा आता मान्सूनच्या जोरदार आगमनाकडे लागल्या असून पावसाच्या प्रतीक्षेत संपूर्ण जिल्हा असल्याचे चित्र आहे.

गतवर्षीच्या तीनपट कमी पाऊस

जालना जिल्ह्यात गतवर्षी १ ते २३ जून दरम्यान ७४.२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी याच कालावधीत केवळ २४.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी इतर तालुक्यांच्या तुलनेत जाफराबाद व घनसावंगी तालुक्यात बरा पाऊस पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT