Water Crisis : जालना जिल्ह्यावर घोंगावतेय पाणीसंकट file photo
जालना

Water Crisis : जालना जिल्ह्यावर घोंगावतेय पाणीसंकट

७ मध्यम व ६० लघू प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा; ३६ लघू प्रकल्पांची पातळी अजूनही जोत्याखाली

पुढारी वृत्तसेवा

Water crisis looms over Jalna district

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने जालना जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सात मध्यम व ६० लघु प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असून, ६० लघु प्रकल्पांपैकी तब्बल ३६ प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली आहे. तसेच जिल्ह्यातील १५ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी १४ बंधाऱ्यांची पाणीपातळीही जोत्याखाली गेली आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात १ जून ते २३ ऑगस्टदरम्यान ३९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ ६६ टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ४९७ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा तुलनेने कमी पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव तसेच लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही.

प्रकल्पांमध्ये पाणी साठले नसल्याचा परिणाम भूजल पातळीवरही झाला आहे. विहिरी आणि बोअरच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झालेली नसल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात १ जून ते २३ ऑगस्टदरम्यान ३९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस दरम्यान, पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा सर्वाधिक फटका खरीप पिकांना बसत आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस यासह अन्य पिके संकटात सापडली आहेत. ढगाळ वातावरणामुळे काही भागांत सोयाबीन व कापूस पिकांवर अळीचा प्रादुर्भावही वाढला आहे. सोयाबीन काही भागांत फुलोऱ्यात, तर काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या निर्णायक टप्प्यावर पिकांना पावसाची नितांत गरज असताना पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दुष्काळाचे सावट

जालना जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात पावसाळ्यातीही वाढ झाली नाही. मोठे पाऊस पडले नाही तर जिल्ह्यावर जनावरांच्या चाऱ्यासह पाणी टंचाईचे गंभीर संकट ओढवणार आहे. जायकवाडी धरणातून चारीमधे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे अंबड व घनसावंगी तालुक्यातील काही भागांना फायदा झाला असला तरी जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट तीव्र होतांना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT