

Jalna News : Dirt reigns in the Hemadpanthi temple area of Anwa
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील आन्वा येथील ऐतिहासिक व पुरातन हेमाडपंथी मंदिर सध्या अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले असून मंदिर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. श्रावण महिन्यामुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असताना परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मंदिराच्या देखभालीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
आन्वा येथील हेमाडपंथी मंदिर हे पुरातन वास्तू आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मंदिराची ऐतिहासिक रचना, स्थापत्यकला आणि धार्मिक महत्त्व यामुळे या ठिकाणी वर्षभर भाविक तसेच इतिहास व पुरातत्त्वप्रेमी नागरिकांची वर्दळ असते. विशेषतः श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, भाविकांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत मंदिर परिसरातील स्वच्छता व्यवस्था अपुरी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मंदिराच्या आवारात तसेच परिसरातील विविध ठिकाणी कचरा पडलेला असून काही ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. यामुळे मंदिर परिसराचे सौंदर्य मलीन होत असून भाविकांच्या आरोग्याच्याही दृष्टीने हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी स्वच्छता राखणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या समस्याकडे तातडीने लक्ष घालून सफाई करण्याची मागणी होत आहे.
देखभाल होणे अपेक्षित
हे मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील असल्याचे सांगितले जाते. सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या देखरेखीखाली असलेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात नियमित स्वच्छता व देखभाल होणे अपेक्षित आहे. मात्र, श्रावण मासात भाविकांची गर्दी वाढत असतानाही परिसरात साचलेल्या कचऱ्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.