Water conservation : शिंदे वडगावात लोकसहभागातून जलसंधारणाचा पॅटर्न file photo
जालना

Water conservation : शिंदे वडगावात लोकसहभागातून जलसंधारणाचा पॅटर्न

लोकसहभागातून उभारलेल्या बंधाऱ्यामुळे शेतीसाठी होणार सिंचनाची सोय, ग्रामविकासाला मिळेल नवी दिशा

पुढारी वृत्तसेवा

Water conservation model through public participation in Shinde-Vadgaon

अविनाश घोगरे

घनसावंगी : जालना जलकवच अभियान २०२६ अंतर्गत घनसावंगी तालुक्यातील शिंदेवडगाव येथे लोकसहभाग, प्रशासनाचे मार्गदर्शन आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याच्या बळावर विकासाची नवी वाट निर्माण होत आहे. जलसंधारण, कृषी विकास, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होत असून शिंदेवडगाव हे गाव तालुक्यासह जिल्ह्यासाठी आदर्श विकास मॉडेल म्हणून उदयास येत आहे.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप पवार तसेच गटविकास अधिकारी प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि एसयूडी लाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक विकासकामांना गती मिळाली आहे.

एसयूडी लाईफ फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या सहभागातून आतापर्यंत सुमारे अडीच किलोमीटर नाल्याचे खोलीकरण पूर्ण झाले आहे. नाल्यातील पाणी अधिक काळ टिकून राहावे यासाठी ठिकठिकाणी लघुबंधारे उभारण्यात आले आहेत. एसयूडी लाईफ फाउंडेशनच्या सहकार्याने जैन कंपनीचे आयएसआय दर्जाचे ठिबक सिंचन संच ३५ शेतकऱ्यांना अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात आले. साधारण ४२ हजार रुपये किंमतीचा संच केवळ १२ हजार रुपयांत मिळाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी झाला आहे. या उपक्रमासाठी उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे आणि जैन कंपनीचे मराठवाडा विभागीय व्यवस्थापक भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या 'खेत बचाव अभियान' अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामाची पूर्वतयारी, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, सेंद्रिया व नैसर्गिक शेती, संतुलित खत व्यवस्थापन आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कृषी तज्ज्ञ श्री. वासरे यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक शेती व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले.

या सर्व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एसयूडी लाईफ फाउंडेशन, मुंबईचे राकेशकुमार, विजय पगारे, शंभोग, बापूसाहेब कोल्हे, राम जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवक मंडळे आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभागही या विकासकामांमध्ये महत्त्वाचा ठरत आहे. सहाय्यक गटविकास अधिकारी पी. पी. खिल्लारे यांचेही मार्गदर्शन या उपक्रमांना लाभत आहे.

बंधाऱ्याची दुरुस्ती

गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत गावातील ऐतिहासिक शिवकालीन बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी २० टक्के लोकसहभाग उभारला, तर एसयूडी लाईफ फाउंडेशनने ८० टक्के निधी उपलब्ध करून दिला. सुमारे चार लाख रुपये खर्चुन बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात आली असून यामुळे पावसाचे पाणी अडविणे, भूजल पुनर्भरण वाढविणे आणि शेतीसाठी आवश्यक पाणीसाठा निर्माण करण्यास मोठी मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT