पिकांना पावसाची प्रतीक्षा File Photo
जालना

Ghansawangi Rain : घनसावंगी तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम

खरिपाची चिंता वाढली; पिके माना टाकू लागली

पुढारी वृत्तसेवा

Waiting for rain continues in Ghansawangi taluka

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले तरी घनसावंगी तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही.. जून-जुलै महिन्यात अपेक्षित असलेल्या पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी झाल्या असल्या तरी दमदार आणि सर्वदूर पाऊस झालेला नाही. त्यामुळे लघु-मोठे तलाव, पाझर तलाव, बंधारे आणि नाले अद्याप कोरडेच असल्याचे चित्र आहे.

पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, मका आदी खरीप पिकांची पेरणी केली. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण झाली; मात्र त्यानंतर पावसाने खंड दिल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. सध्या कापूस व सोयाबीन पिके वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत आणखी काही दिवस पावसाने दडी मारल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरीवर मोठा खर्च केला आहे. अनेकांनी कर्ज काढून शेतीची तयारी केली. मात्र, पावसाची अनिश्चितता कायम राहिल्याने हा खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. पिके डोळ्यांसमोर उभी असताना गरज निर्माण झाली आहे.

तालुक्यातील अनेक लघु व पाझर तलाव तसेच बंधाऱ्यांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नाही. दमदार पाऊस नसल्याने जलसाठ्यांमध्ये अत्यल्प पाणी आहे. तलाव कोरडे राहिल्याने भूजलपातळी वाढण्यासही अडथळा निर्माण झाला आहे.

कापूस आणि सोयाबीनला सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पिकांसाठी बियाणे, खते आणि मशागतीवर मोठा खर्च केला आहे.. पाऊस झाला नाही तर केलेला खर्चही वसूल होणे कठीण आहे. तलाव, बंधारे आणि विहिरींमध्येही पुरेसे पाणी नाही. त्यामुळे शासनाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करावी.
प्रवीण धांडगे, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT