

Action taken against illegal sand transport; two Hyva trucks seized
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना तालुक्यातील सामनगाव रोड परिसरात दोन हायवा वाहनांमधून विनापरवाना व बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून दोन्ही वाहने व वाळूसह तब्बल ४५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध जालना तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक तेजवीर सिंह संधू यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सामनगाव रोडने दोन हायवा वाहनांमधून विनापरवाना वाळूची चोरी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी दोन हायवा वाहनांमधून वाळूची वाहतूक करताना आढळून आल्याने वाहने ताब्यात घेण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४५ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी इतिहास किसन लक्कर (रा. धावडे, ता. जि. जालना), राहुल जगन्नाथ शेळके (हायवा मालक), श्यामुवेल पावलस महापूरे (रा. गोलापांगरी, ता. जि. जालना) आणि उमेशकुमार रमेशचंद्र मोहता (हायवा मालक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत दोन हायवा वाहने व त्यातील वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास जालना तालुका पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजवीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ तसेच पोलिस अंमलदार भाऊराव गायके, गोपाल गौशिक, कैलास खाडे, दीपक धुळे, वसंत घस आदींनी केली-
अवैध उपसा जोरात
जालना शहरासह जिल्ह्यात पावसाळा सुरु असतांनाही अवैध वाळुची चोरटी वाहतुक सुरुच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मोठे पाऊस नसल्याने नदी पात्रात अत्यल्प पाणी असल्याने अवैध वाळू उपसा जोरात असल्याचे दिसत आहे.