Jalna Crime News : जिमबाहेर तुफान राडा : तरुणाच्या डोक्यात मारली लोखंडी आकाडी ! file photo
जालना

Jalna Crime News : जिमबाहेर तुफान राडा : तरुणाच्या डोक्यात मारली लोखंडी आकाडी !

चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; पूर्ववैमनस्यातून वाद झाल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

Violent clash outside the gym: Iron rod struck on youth's head

जालना, पुढारी वृत्तसेवाः जिममध्ये व्यायाम करून बाहेर पडलेल्या एका १९ वर्षीय तरुणाला "माझ्या मोबाईलला हात का लावला?" असा जाब विचारत अर्वाच्च शिवीगाळ करून त्याच्या डोक्यात लोखंडी आकाडी मारून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना जालन्यातील चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री नगर (जालना) येथील रहिवासी असलेला आनंद बालाप्रसाद जाधव (वय १९, राळा हिवरा येथे बी.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी) हा बुधवारी (दि. २३ सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास राज महर्षी दयानंद जिममध्ये व्यायामासाठी गेला होता. व्यायाम आटोपून सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास तो जिमच्या बाहेर आला असता, कन्हैयानगर येथील अदिल खान याने त्याला अडवले. "तू जिममध्ये असताना माझ्या मोबाईलला हात का लावला?" असे म्हणत अदिलने आनंदसोबत वाद घालण्यास सुरुवात केली व त्याला अर्वाच्च शिवीगाळ केली.

वाद वाढल्याने आनंद जाधव हा आपली मोटरसायकल घेऊन निघण्याच्या तयारीत असतानाच, संशयित आरोपी अदिल खान याने त्याच्या हातात असलेल्या लोखंडी आकाडीने आनंदच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात आनंदचे डोके फुटून तो रक्ताळला.

त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महंमद बशीर शेख याने मध्यस्थी करत आनंदला अदिलच्या तावडीतून सोडवले. हल्ल्याच्या घटनेनंतर जखमी आनंद जाधव याने आपल्या भावाला (अमर जाधव) फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनी चंदनजीरा पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांनी तत्काळ जखमी आनंदला उपचारासाठी जालन्यातील सरकारी रुग्णालयात पाठवले. तेथे औषधोपचार घेतल्यानंतर आनंद जाधव याच्या फिर्यादीवरून चंदनजीरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अदिल खान (रा. कन्हैयानगर, जालना) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा (प्र.ख.क्र. ०६३७/२०२६) दाखल करण्यात आला आहे. ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT