

Online portal launched for women farmer certification
जाफ्राबाद, पुढारी वृत्तसेवाः महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ लागू केल्यानंतर महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता देण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जाफराबाद तालुक्यातील पात्र महिला शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी केले आहे.
महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय कृषी योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा तसेच इतर शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे प्रमाणपत्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पात्र महिला शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, संबंधित ग्रामपंचायत अथवा नगरपंचायत स्तरावर अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आणि शेतीमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिलांचा महिला शेतकरी म्हणून विचार करण्यात येणार आहे. पात्र महिला शेतकऱ्यांनी https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा.
यामध्ये पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, फळबाग, फुलशेती, रेशीम उद्योग, मधमाशीपालन, कृषी प्रक्रिया व मूल्यवर्धन, भाजीपाला व फळांची विक्री तसेच इतर शेतीपूरक व्यवसायांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिलांचा समावेश आहे. महिला शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे हीच एकमेव अट नसून, शेतीच्या कामकाजात प्रत्यक्ष सहभाग असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कुटुंबाच्या शेतीमध्ये प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या पात्र महिलांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
ग्रामसभा करणार पडताळणी : ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत अथवा नगरपंचायत स्तरावर आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार महिलेचा शेतीतील प्रत्यक्ष सहभाग याची पडताळणी करण्यात येणार आहे. पात्र महिलांची माहिती ग्रामसभेसमोर ठेवून आवश्यक ती पडताळणी पूर्ण केल्यानंतर नियमानुसार महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.