वडीगोद्री: पडलेल्या भीषण दुष्काळामुळे लोकांना आर्थिक शेती तसेच पाण्यासंदर्भात खूप मोठी अडचण निर्माण झाली असून शेतात उगलेच नाही तर जगायचे कसे हा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मायक्रो फायनान्स सूक्ष्म कर्जाचे हप्ते एक वर्षासाठी स्थगित करावे अशी मागणी नागरिकातून होत आहे. या संदर्भात निवास उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, सध्या तत्काळ कर्ज घ्यायचे असेल तर शेतकरी व शेतमजूर हे मायक्रो फायनान्सचा आधार घेतात व फॉर्म भरून आधार कार्ड जमा केली की महिलांना तत्काळ तीस हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम तत्काळ त्यांच्या खात्यात जमा होते. त्यामुळे या फायनान्सचे ग्राहक अंबड तालुक्यात व वडीगोद्री परिसरात खूप मोठे आहे.
दर पंधरा दिवसांनी या कर्जाच्या परतफेडीचा हप्ता असतो. परंतु यावर्षी पडलेल्या दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांना सोबतच शेतमजुरांना व बिगारी काम करणारांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न निघाले नाहीस तर शेतमजुरांनाही कोणी शेतात कामाला लावत नाही. त्याचबरोबर बांधकाम व्यवसायावरही याचा फटका बसला असून ग्रामीण भागात बांधकाम ही ठप्प झालेली आहेत. या सर्वांची अडचण लक्षात घेऊन मायक्रो फायनान्स ची सक्तीची वसुलीला दुष्काळामुळे वर्षभर स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी ॲड. डी .पी. पाटील, ॲड. महेश धनावत, ॲड. वसीम शेख, डॉ. देवराव चौरे, डॉ. रमेश तारगे बाबासाहेब हेमके, सुनील राखुडे, ढवळे आदी उपस्थित होते.
यावर्षी भीषण दुष्काळामुळे शेतातच काही उगले नाही. यावर्षी जगायचे कसे हाच प्रश्न निर्माण झाला असून तर कर्जाचे हप्ते कोणत्या आधारावर फेडायचे यासाठी मायक्रो फायनान्सच्या कर्जाला एक वर्षाची स्थगिती द्यावी.प्रकाश लीपने, वडीगोद्री