जालना, पुढारी वृत्तसेवा : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. गत पंधरवड्यात १२ टक्क्यांवर असलेला पाणी साठा हा सुमारे १६ टक्क्याने वाढून २८.४८ टक्के झाला. तर चालू आठवड्यात या टक्केवारीत किंचितशी साडे तीन टक्के वाढ होत आतापर्यंत जिल्ह्यातील ५७ लघु व ७ मध्यम प्रकल्पात सुमारे ३१.७१ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. Useful water storage in the district's projects is at 31.71 percent.
दरम्यान, जालना जिल्ह्यात एकूण सात मध्यम आणि ५४ लघु प्रकल्प आहे. या प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठ्याची आकडेवारी २३४.८८ दलघमी इतकी आहे. सध्या ७ ऑगस्ट पर्यंत कल्याण मध्यम प्रकल्प, कल्याण गिरीजा, अप्पर वुधना, जुई मध्यम प्रकल्प, धामणा, जुई आणि गलाटी या सात मध्यम प्रकल्पात २६.६९ दलघमी साठा उपलब्ध आहे.
तर मागच्या आठवड्यात हा साठा १६.१८ टक्के इतका होता. आजपर्यंत ५७ लघु प्रकल्पात ४३.१७ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सात मध्यम प्रकल्पापैकी जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेला आहे. तर ५७ पैकी १६ लघु प्रकल्प जोत्याखाली गेल्या आहेत. तर जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा येथील लघु पाझर तलावाला अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
सध्या ७लघु प्रकल्पाची पाणी पातळी ही ५१ ते ७५ टक्क्यांपर्यंत आली आहे. तर ३ मध्यम आणि १२ लघु प्रकल्पाची पातळी ही २५ ते ५० टक्क्यांपर्यंत आली आहे. ० ते २५ पर्यंत पाणी पातळी असलेले मध्यम प्रकल्प ३ असून लघु प्रकल्प ११ इतके आहेत. सध्या जिल्हाभरातील मध्यम प्रकल्पापैकी १ प्रकल्प ज्योत्याखाली असून सुमारे १६ लघु प्रकल्पाची पाणी पातळी ज्योत्याखाली आहे.
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला असून, अद्यापी पावसाने जोरदार हजेरी लावली नाही. परंतु, या महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पुन्हा पाउस कार्यान्वित होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, जिल्ह्यात दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतच्या मागील २४ तासांत सरासरी ९.७० मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे. यात जालना तालुक्यात १४.००, बदनापूर १४.२०, भोकरदन ०.७०, जाफराबाद १.५०, परतूर २.१०, मंठा ५.४०, अंबड ११.९०, घनसावंगी २३.९० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.