Use of AI is necessary to increase sugarcane production
शहागड, पुढारी वृत्तसेवा : ऊस उत्पादन वाढविण्यासाठी एआयचा वापर गरजेचा आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर युनिट नं.१ व सागर युनिट नं.२ (तीर्थपुरी) यांचा २०२५-२६ चा गळीत हंगाम उत्साहात सुरू झाला. कारखान्याच्या ४२ वा गळीत हंगाम सुरू होऊन युनिट नं. १ साठी १४ लाख मेट्रिक टन, तर युनिट नं.२ साठी ६ लाख मेट्रिक टन अशा एकूण २० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
यावेळी बी.बी. ठोंबरे अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, संजय कोलते, साखर आयुक्त. संभाजी कडू पाटील, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, उपाध्यक्ष उत्तमराव पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चेअरमन सतीश टोपे, संचालक मनोज मरकड, सतीश होंडे, धनंजय दुफाके, विकास कव्हळे, अशोक मांगदरे, व्यवस्थापकीय संचालक बी.टी. पावसे, कार्यकारी संचालक आर.ए. समुद्रे, एस. व्ही. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, मागील गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये दोन्ही युनिटकडे १२ लाख मे.टन उसाचे गाळप झाले आहे. गळीतास आलेल्या उसास एकूण २८३२/- प्रति मे.टन प्रमाणे अंतिम ऊस अदा केला आहे. कारखान्याचे अर्कशाळा प्रकल्पामध्ये युनिट नं. १ कडे ३ कोटी ३२ लाख ६० हजार ५३९ बल्क लिटर्स व युनिट नं.२ कडे १ कोटी २८ लाख ५८ हजार ६६८ बल्क लिटर्स इथेनालचे उत्पादन झाले आहे. वीज निर्मिती प्रकल्पामध्ये ४ कोटी ७९ लाख ५४ हजार युनिट वीज निर्मिती झाली असल्याचे सांगितले. याप्रसंगी जालना जिल्हा बँकेचे चेअरमन सतीषभाऊ टोपे, जालना जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष निसार देशमुख, कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, कारखान्याचे सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शेतीचा विकास करावा : गिरी
साखर संचालक यशवंत गिरी म्हणाले की, साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला आहे. ग्रामीण भागातील अर्थ कारण बदलले आहे. भविष्यात शेती वाढणार नाही परंतु कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेतले पाहिजे. शेतकरी व साखर कारखान्यांनी नवं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून साखर कारखाना व ऊस शेतीचा विकास करावा.
कामगाराच्या पाठीशी
जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की, अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अनुदान देण्यात येणार आहे. शासन नेहमीच शेतकरी कष्टकरी, कामगार यांच्या पाठीशी उभे आहे. शासकीय उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.