Upload Waqf property information on Umaid portal
जालना, पुढारी वृत्तसेवाः वक्फ मालमत्तेची माहिती 'उमेद' पोर्टलवर ५ डिसेंबरपर्यंत अपलोड करावी नसता शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिला.
शुक्रवारी जालना येथील सरकारी विश्रांतीगृहात मुस्लिम प्रतिनिधींच्या बैठकीत बोलताना काझी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने वक्फ दुरुस्ती अधिनियमांतर्गत ५ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे कामात गती आवश्यक आहे. "राज्यात १८,००० पेक्षा अधिक वक्फ मालमत्ता आहेत, परंतु आतापर्यंत फक्त ३,००० मालमत्तांची माहिती अपलोड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगीतले.
"कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी आपली जबाबदारी पार पाडण्यात निष्काळजीपणा करीत असल्याचे आढळल्यास निलंबनासह कठोर कारवाई करण्यात येईल," असा इशारा त्यांनी दिला. बैठकीत प्रतिनिधींनी अध्यक्षांना विनंती केली की, वक्फ अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य आणि मदत उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून 'उमेद' पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे काम सुरळीत पार पडेल.
यावेळी मुतवली आणि मशीद व्यवस्थापन समित्यांना या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबतही चर्चा झाली. या मागणीवर प्रतिसाद देताना काझी म्हणाले की, मुदत पूर्ण होईपर्यंत वक्फ कार्यालये आठही दिवस सुरू राहतील आणि अधिकाऱ्यांना रजा न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. "या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल," असा इशारा त्यांनी दिला. काझी यांनी मुतवली आणि व्यवस्थापन समित्यांना ५ डिसेंबरपूर्वी 'उमेद' पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले.
बैठकीस ज्येष्ठ नेते इकबाल पठाण, महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे संयोजक अब्दुल मुजीब, अयूब खान, फहीम फलाही, इकबाल कुरेशी, शेख इस्माईल, अहमद नूर कुरेशी, अमजद फारुकी, अता मोहम्मद बख्शी, सोहेल काझी, अब्दुल हमीद, शेख वसीम तसेच वक्फ अधिकारी रेहान हस्मी, शेख इमरान आदी उपस्थित होते.
तर निलंबन करणार
राज्यात १८ हजारांपेक्षा अधिक वक्फ मालमत्ता आहेत, परंतु आतापर्यंत फक्त ३ हजार मालमत्तांची माहिती अपलोड करण्यात आली असल्याचे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी सांगीतले. "कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी आपली जबाबदारी पार पाडण्यात निष्काळजीपणा करीत असल्याचे आढळल्यास निलंबनासह कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.