

Municipal corporation's electronic charging station unused
जालना, पुढारी वृत्तसेवा : पर्यावरण-पूरक कचरा संकलनासाठी मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आलेल्या महापालिकेचा इलेक्ट्रॉनिक घंटागाड्यांचे चार्जिंग प्रकल्प वापराविना पडून असल्याचे चित्र आहे. नादुरुस्त घंटागाड्या बंदच असल्याने चार्जिंग स्टेशनमधे येत नसल्याने स्वच्छ भारत अभियानास हातभार लावण्यासाठी उभारलेला हा उपक्रम धूळखात आहे.
शहरारतील मोती बाग परिसरातील जलतरण तलावाजवळ उभारण्यात आलेले महापालिकेचे चार्जिंग स्टेशन सध्या बंद अवस्थेत असून, त्यावर अवकाळा आणि दुर्लक्षाचे सावट पसरले आहे. नगरपालिकेने शहरातील स्वच्छता व्यवस्थापन सुधारण्यासाठी काही वर्षांपूर्वी तब्बल १० इलेक्ट्रॉनिक घंटागाड्या खरेदी केल्या होत्या.
या गाड्यांद्वारे घराघरातून कचरा संकलन करून स्वच्छ भारत अभियानास हातभार लावण्याचा उद्देश होता. मात्र, अल्पावधीतच या गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड होऊ लागला. दुरुस्तीचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने सर्व गाड्या कालांतराने नादुरुस्त झाल्या आणि वापराविना उभ्या राहिल्या. या गाड्यांच्या चार्जिंगसाठी जलतरण तलाव परिसरात आधुनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले होते. परंतु, दहा ई-बाईक घंटागाड्या नादुरुस्त झाल्याने स्टेशनचा वापरच थांबला आहे.
परिणामी, लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेले हे केंद्र आता शोभेचे बनले आहे. स्टेशनवरील उपकरणे, केबल्स, प्लग पॉइंट्स आदींवर धूळ साचली असून काही ठिकाणी गंजही दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, शहरातील स्वच्छतेसाठी करण्यात आलेली ही योजना चांगली होती.
लक्ष देण्याची गरज
महापालीकेचे चार्जिंग स्टेशन आणि इलेक्ट्रॉनिक गाड्या दोन्ही एकाच अवस्थेत बंद आणि उपयोगाविना पडून आहेत. नगरपालिकेने या प्रकल्पाकडे तातडीने लक्ष देत गाड्या दुरुस्त करून चार्जिंग स्टेशन पुन्हा कार्यान्वित करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. अन्यथा, शहरातील स्वच्छतेच्या योजनेवर खर्च झालेला लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याची जबाबदारी प्रशासनावर येईल, अशी चर्चा शहरात सुरू आहे.