जालना; पुढारी वृत्तसेवा: जालना शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पडलेल्या अवकाळी पावसामुळे दाणादाण उडाली. रविवारी (दि.२६) रात्री सुरु झालेल्या या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. अवकाळी पावसामुळे मोसंबी, द्राक्षसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हात काही ठिकाणी गारपीट झाल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ४०.४ मिमी पावसाची नोद झाली. तर जालना व बदनापूर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. (Unseasonal Rain)
जालना शहर व जिल्ह्याला रविवारी (दि.२६) रात्री अवकाळी पावसाने झोडपले. विजांचा कडकडाट, जोरदार वारा, गारांसह पावसाच्या टपोऱ्या थेंबामुळे अनेक ठिकाणी रबीची पिके झोपली. पावसाळ्यात पूर न आलेले ओढे-नालेही काही ठिकाणी वाहतांना दिसून आले. या मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असून, शेतकरी मेटाकुटीला आला आहे. (Unseasonal Rain)
मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. सोमवारी दुपारपर्यंत विज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. दरम्यान जालना जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात जालना ८३, भोकरदन ६५.९ जाफ्राबाद ६८.४ बदनापूर ९२, अंबड ६६, परतूर ५७.९, घनसावंगी ५७.३, मंठा ७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Unseasonal Rain)