Two ST buses collide head-on near Shahapur; 41 passengers injured including both drivers
जालना, प्रतिनिधी : जालना-आंबड राष्ट्रीय महामार्गावरील शहापूर गावाजवळील अरुंद पुलावर शनिवारी (४ जुलै) सकाळी सुमारे ९.१५ वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले असून एकूण ४१ प्रवासी जखमी झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
जालना महामार्ग पोलीस केंद्राच्या हद्दीतील या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रामदास निकम, हेड कॉन्स्टेबल बाबर, हेड कॉन्स्टेबल गोल्डे, एलपीसी आधे, डीपीसी केदारे व पोलीस कॉन्स्टेबल सर्वे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
जालना येथुन बीडच्या दिशेने जाणारी अंबड आगाराची बस क्रमांक (एम एच १४ बी टी ३०२२) व भांबेरी येथुन अंबड येथे शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणारी अंबड आगाराची बस क्रमांक (एम एच १४ एम एच १७५०) या दोन बसेस ची शहापूर येथील गल्हाटी नदीच्या पुलावर समोरासमोर धडक झाली या अपघातात चालक एस. के. ठोसर तसेच दुसऱ्या बसचे चालक सारंग काकासाहेब ढोले (वय ५२) हे गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय दोन्ही बसमधील ४१ प्रवाशांना विविध प्रकारच्या दुखापती झाल्या.
जखमींना तात्काळ रुग्णवाहिकांच्या मदतीने सामान्य रुग्णालय, आंबड तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शहापूरजवळील अरुंद पुलावरून जाताना दोन्ही बसचालकांनी समोरील वाहनाचा योग्य अंदाज न घेतल्याने दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. धडकेमुळे दोन्ही बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र महामार्ग पोलिसांनी तातडीने दोन्ही बस रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने दोन्ही बस आंबड एसटी डेपोमध्ये हलविण्यात आल्या. या घटनेची माहिती गोंदी पोलीस ठाणे तसेच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली असून गोंदी पोलिसांनीही बचावकार्यात सहभाग घेतला. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पहाणी, विचारपूस
अपघात झालेल्या स्थळाची जिल्हा पोलिस अधिक्षक तेघबीर सिंह यांनी पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या प्रकृतीची विचारणा केली. शिवाय त्यांनी घटनास्थळी एसटीच्या अधिकाऱ्यांनी भेट देउन अपघाताच्या कारणांची माहीती जाणून घेतली.