Two individuals arrested for stealing a tractor from the Dahipuri area
अंबड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील दहिपुरी शिवारातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या दोन संशयित आरोपींना अंबड पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी चोरीचा ट्रॅक्टरही हस्तगत केला आहे.
दहिपुरी येथील शेतकरी बळीराम पाराजी सावंत यांचा ट्रॅक्टर (क्रमांक MH-21-BQ-1844) हे शेतातील काम आटोपल्यानंतर तो शेताच्या आखाड्यावर उभा करण्यात आला होता. मात्र, २० नोव्हेंबर ६ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ते शेतात गेले असता ट्रॅक्टर जागेवर दिसून आला नाही. त्यानी परिसरात शोध घेऊनही ट्रॅक्टर न मिळाल्याने २१ नोव्हेंबर रोजी अंबड पोलिस ठाण्यात सावंत यांनी तक्रार दाखल केली.
या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. यावेळी खबऱ्याने संशयितांची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार, २३ नोव्हेंबर रोजी अंबड पोलिसांच्या पथकाने संभाजीनगर येथील सातारा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बीड बायपास रोडवरील हॉटेल शिदोरी छत्रपती परिसरात सापळा रचला. या कारवाईत नागेश्वर बबन फरताडे व आदित्य जालिंदर रंजणे (दोघेही रा. दहिपुरी, ता. अंबड) यांना ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक चौकशीत दोघांनी दहिपुरी शिवारातून ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेला ट्रॅक्टर अंबड-वडीगोद्री रोडवरील डावरगाव फाट्याजवळ लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी तो हस्तगत केला आहे. संशयितांकडून शेतकऱ्यांच्या शेतातील औजारे, जनावरे किंवा विद्युत मोटारींच्या चोरीत हात आहे का, याचा सखोल तपास करण्यात येत आहे. संशयीतांच्या चौकशीसाठी पोलिसांकडून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
यांची कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक, जालना, अपर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलिस ठाणे अंबडचे पोलिस कर्मचारी सहभागी होते. अंबड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.