घनसावंगी ः तालुक्यात तूर काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर करण्यात येत आहे.  pudhari photo
जालना

Farm Labor Crisis : मजुरांच्या टंचाईमुळे तूर काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर

कमी वेळेत व कमी खर्चात तूर काढणी, शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान

पुढारी वृत्तसेवा

घनसावंगी ः तालुक्यात मजुरांची तीव्र टंचाई व वाढती मजुरी लक्षात घेता अनेक गावांतील शेतकऱ्यांनी तूर पिकाची काढणी हार्वेस्टरच्या माध्यमातून करण्यास सुरुवात केली आहे. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत हार्वेस्टरमुळे वेळ, श्रम आणि खर्च या तिन्ही बाबींमध्ये मोठी बचत होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये या आधुनिक यंत्राकडे मोठ्या प्रमाणावर पसंती वाढताना दिसत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड करण्यात आली आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे तूर पीक जोमात वाढले. अनेक शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीन या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून तूर घेतली आहे. सध्या हे पीक काढणीस आले असून, त्यासाठी आवश्यक मजूर मिळणे अत्यंत कठीण झाले आहे.

जेथे मजूर उपलब्ध होत आहेत. तेथे प्रतिदिन 500 ते 600 रुपये मजुरीची मागणी केली जात आहे. एका एकरातील तूर काढणीसाठी सुमारे दहा मजूर लागतात. त्यामुळे केवळ मजुरीवरच पाच हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. त्यात मळणी यंत्र, वाहतूक व इतर खर्च धरल्यास एकूण खर्च दहा हजार रुपयांच्या आसपास पोहोचतो. हा वाढता खर्च सद्यपरिस्थितीत शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर हार्वेस्टरचा वापर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. कमी वेळेत, कमी खर्चात आणि मजुरांवरील अवलंबित्व कमी करत तूर काढणी शक्य होत असल्याने आता मजूर व मळणी यंत्राऐवजी हार्वेस्टरलाच प्राधान्य दिले जात आहे. परिणामी तूर काढणीमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढत असून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असल्याचे चित्र दिसते.

एका एकरात सात हजार रुपयांची बचत

एका एकरातील तूर पिकाची सोंगणी करण्यासाठी हार्वेस्टरला अवघा अर्धा तास लागत असून यासाठी साधारण तीन हजार रुपयांचा खर्च येतो. याउलट मजूर व मळणी यंत्राच्या सहाय्याने काढणी केल्यास दहा हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याने शेतकऱ्यांना सुमारे सात ते साडेसात हजार रुपयांची बचत होत आहे.

तूर पीक चांगले आले आहे, पण मजुरांअभावी काढणी अडकण्याची भीती होती. हार्वेस्टरमुळे ती अडचण दूर झाली. कमी वेळेत पीक काढणी होते, दाण्याची नासाडी होत नाही आणि खर्चही नियंत्रणात राहतो. आजच्या काळात शेती टिकवायची असेल तर अशा यंत्रांचा वापर गरजेचा आहे. हार्वेस्टरमुळे शेतीला नवा श्वास मिळाल्याचे समाधान वाटते.
सुंदर आनंदे, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT