जालना ः जालना शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच लोकशाहीचा हा उत्सव सर्वसमावेशक व्हावा, यासाठी प्रशासनाच्यावतीने स्वीप उपक्रमांतर्गत शहरात विविध ठिकाणी नावीन्यपूर्ण जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यामध्ये महाविद्यालयीन युवक आणि व्यापारी वर्गाचा मोठा सहभाग दिसून आला.
शहरातील स्थानिक जे.ई.एस. महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात शेकडो नवमतदार विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापक आणि प्राचार्य यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना मतदान प्रतिज्ञा देण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीचे फलक (बॅनर्स) घेऊन “मतदान आम्ही करणार, तुम्ही पण करा”अशा घोषणांनी महाविद्यालय परिसर दणाणून सोडला.
यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, केवळ स्वतः मतदान न करता कुटुंबातील सदस्य, शेजारी, नातेवाईक आणि विशेषतः दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी. शहरातील नवीन मोंढा भुसार मार्केटमध्येही जनजागृतीचा विशेष उपक्रम राबवण्यात आला.
प्रशासकीय उपस्थिती
या मोहिमेत महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालना महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असून मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

