Jalna Agriculture pudhari photo
जालना

Jalna Agriculture : ट्रॅक्टरच्या युगात हरवली बैलांच्या नांगरीची परंपरा

बैल नांगर झाले इतिहासजमा, शेतात यांत्रिकीकरण वाढले

पुढारी वृत्तसेवा

घनसावंगी ः एकेकाळी ग्रामीण भागातील शेतीचे वैभव, शेतकऱ्यांच्या समृद्धीचे प्रतीक आणि गावच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग मानली जाणारी चार, सहा व आठ बैलांच्या साहाय्याने केली जाणारी नांगरणी आता इतिहासजमा होत चालली आहे.

शेतीतील वाढते यांत्रिकीकरण, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर व पॉवर टिलरच्या वापरामुळे पारंपरिक बैल नांगराची परंपरा लोप पावत असून नव्या पिढीला ती केवळ वडिलधाऱ्यांच्या आठवणींमधूनच ऐकायला मिळत आहे.मार्च महिना सुरू झाला की खरीप हंगामाच्या तयारीची लगबग सुरू व्हायची. शेतकरी बैलजोडी घेऊन पहाटेपासून शेतात उतरायचे. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजुळ नाद आणि नांगराच्या फाळाने उलटली जाणारी काळी कसदार जमीन हे ग्रामीण जीवनाचे आकर्षक चित्र असायचे.

खोल नांगरणीसाठी चार, सहा तर काही मोठे शेतकरी आठ बैलांचा वापर करत असत. बैलांची ताकद, त्यांची निगा आणि नांगरणीतील कौशल्य हे शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेचे मोजमाप मानले जात होते.पूर्वी गावागावांत बैलांच्या खरेदी-विक्रीचे बाजार भरत असत. उत्तम बैलजोडी असणे ही शेतकऱ्यांसाठी अभिमानाची बाब होती.

नांगरणी, वखरणी, पेरणी तसेच वाहतुकीची बहुतांश कामे बैलांच्या सहाय्याने होत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्यांचे स्थान महत्त्वाचे होते.मात्र गेल्या दोन दशकांत शेतीत यांत्रिकीकरणाचा वेगाने शिरकाव झाला. ट्रॅक्टरच्या सहाय्याने काही तासांत मोठे क्षेत्र नांगरता येत असल्याने शेतकरी यंत्रसामग्रीकडे वळले आहेत. वाढता चारा खर्च, बैलांच्या संगोपनावरील आर्थिक भार, मजुरांची कमतरता आणि वेळेची बचत या कारणांमुळे बैल पाळण्याचे प्रमाण झपाट्याने घटले आहे.

घनसावंगी तालुक्यात पूर्वी बहुतांश शेतकऱ्यांकडे बैलजोडी दिसत असे. आज मात्र अनेक गावांमध्ये मोजकेच शेतकरी बैल पाळताना आढळतात. परिणामी बैलगाडी, बैल नांगर आणि त्याभोवती विकसित झालेली पारंपरिक शेती संस्कृती हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या मते, बैलांच्या साहाय्याने केलेली नांगरणी जमिनीची नैसर्गिक रचना टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरत होती. बैल हे केवळ कामाचे साधन नव्हते, कुंटूबातील सदस्य होते.

पूर्वी आमच्याकडे सहा बैलांची नांगरणी केली जायची. बैल हे आमच्या कुटुंबाचा एक भाग होते. आज ट्रॅक्टरमुळे कामे जलद आणि कमी वेळेत होत असली तरी बैल नांगराची परंपरा, घुंगरांचा नाद आणि शेतीशी असलेले भावनिक नाते हळूहळू हरवत चालल्याची खंत वाटते.
तुळशीराम आनंदे, शेतकरी
चार, सहा आणि आठ बैलांच्या नांगरणीचा सुवर्णकाळ आम्ही अनुभवला आहे. त्या काळात बैल हे शेतकऱ्यांचे खरे साथीदार मानले जात होते. त्यांच्या जोरावर शेतीची सर्व कामे पार पडत असत. यंत्रसामग्रीमुळे शेतीची कामे सुलभ झाली असली तरी बैलजोडीचे महत्त्व, त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि ग्रामीण संस्कृतीची ओळख जपणारी परंपरा आता दुर्मिळ होत चालली आहे.
विठ्ठल घोगरे, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT