

कणकवली : अजित सावंत
कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशात पशुधनावर आधारित कृषी संस्कृतीला फार मोठे महत्त्व होते मात्र काळाच्या ओघात शेतीपद्धतीत अनेक बदल झाले, आधुनिक तंत्रज्ञनाचा शेतीमध्ये वापर सुरू झाला आणि कोकणातील शेत शिवारात नांगरणीसाठी राबणाऱ्या बैलजोडयाही दुर्मिळ झाल्या आहेत.
परिणामी कोकणातील प्रमुख बाजारांमध्ये उन्हाळी हंगामाच्या अखेरीस भरणारे बैल बाजारही आता बंद झाले आहेत. यंदा मात्र इंधन टंचाईच्या संकटात कोकणातील शेतकऱ्यांना पूर्वीच्या बैलजोडयांच्या औताची प्रकर्षाने आठवण झाली आहे. इंधन टंचाईत पॉवर ट्रिलर चालवणार तरी कसे ? अशी चिंता बळीराजाला सतावत आहे. गेल्या 10 वर्षांपूर्वी पर्यंत कोकणातील भात शेती ही बैलजोडयांच्या नांगरणीवरच अवलंबून होती.
प्रत्येक शेतक-याच्या घरी मोठ्या प्रमाणावर पशुधन होते. एकाएका शेतक-याकडे दोनदोन-तीनतीन बैलजोडया असायच्या. त्या काळी ज्याच्या घरी अधिक पशुधन आणि शेती तो शेतकरी अधिक सधन मानला जायचा. घराघरात दही दुधाचा राबता असायचा. त्या काळी पावसाळी हंगामाच्या अगोदर म्हणजेच मे अखेरीस कोकणातील बाजारपेठांमध्ये बैल बाजार भरायचे. हे बाजार म्हणजे केवळ जनावरांची खरेदी विक्री नसायची तर ती एक संस्कृती होती.
सिंधुदुर्गात दर मंगळवारी जिल्ह्यातला सर्वात मोठा बैलबाजार कणकवलीत भरायचा या. शिवाय फोंडाघाट, वैभववाडी, दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी मध्येही बैलबाजार भरत असत. त्यावेळी कोकणातील विविध भागांबरोबरच कोल्हापूर, बेळगाव, कर्नाटकातून बैल विक्रीसाठी येत असत. जूने जाणकार शेतकरी या बैलांच्या किंमती ठरवत असत. शेतकरी देखील उत्साहाने बैलजोडयांची खरेदी करत असत.
तर अनेक शेतक-यांच्या घरातील पशुधनातुनच शेतीसाठी बैल उपलब्ध होत असत. त्या काळात शेत नांगरणी ही बैलांवरच अवलंबून असल्याने या पशुधनाचे महत्व मोठे होते. त्या काळी खास मुंबईतील चाकरमानीही गावी शेतीसाठी रजा घेऊन येत असत. मोठ्या प्रमाणावर कोकणात भात शेती त्या काळी केली जात असे कारण भात पीक हेच कोकणचे प्रमुख पीक होते. घराघरात माणसांचीही संख्या मोठी असल्याने त्या काळात शेतीही मुबलक प्रमाणात केली जात असे. मात्र नंतरच्या काळात कोकणात मनुष्य बळ हळूहळू कमी झाले, लोकसंख्येवरही मर्यादा आली, पशुधन सांभाळायला माणसं मिळेनात.
चारा, पाणी, गोठा या सर्व गोष्टी खर्चीक झाल्या परिणामी लोकानी आपले पशुधन कमी केले. असलेल्या बैलजोडया विकून टाकल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेत नांगरणीसाठी सरकारी अनुदानावर मिळणारे पॉवर ट्रिलर खरेदी केले. ४० ते ६० हजारापर्यंत मिळणारे हे पॉवर ट्रिलर शेतक-यांना जनावरे सांभाळण्यापेक्षा परवडत असल्याने गेल्या १० वर्षांत कोकणातील शेतशिवारात बैलजोडयांच्या औता ऐवजी पॉवर ट्रिलरचाच आवाज घुमताना ऐकू येतो.
पूर्वी कोकणातील गावागावात १०० टक्के नांगरणी ही बैलांच्या औतावरच अवलंबून होती आता केवळ ५ टक्केच औत शेतात दिसतात ती ही आता दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे बैलच राहीले नाहीत तर बैलबाजार तरी भरणार कुठुन? त्यामुळे बैलबाजारही बंद झाले आहेत. ही परिस्थिती एकीकडे असताना आखाती देशातील युद्ध आणि उर्जा संकटामुळे गेल्या दोन महिन्यापासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचीही टंचाई देशभर जाणवत आहे.
त्यातच सरकारने १५ दिवसांत ४ ते ५ वेळा इंधन दरवाढ केली आहे. दोन महिन्यापूर्वी 105 रु. प्रति लिटर मिळणारे पेट्रोल आता ११३ रु. तर ९५ रुपयाला प्रति लिटर मिळणारे डिझेल १०३ रुपयापर्यंत गेले आहे. ते ही टंचाई मुळे मिळत नाही अशी स्थिती आहे. आता मान्सून जवळ आल्याने शेतक-यांची भात पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. ज्यांचे स्वतः चे पॉवर ट्रिलर आहेत त्यांना चिंता आहे ती पेट्रोल, डिझेल मिळणार कसे याची.
गाडयांमध्ये भरायला पेट्रोल नाही तर शेतीला कसे मिळणार? हा प्रश्नच आहे, तर भाडयाने घ्यायचे झाल्यास त्यांचे दरही यंदा इंधन टंचाईमुळे दामदुप्पट होणार आहेत. २०१० साली पॉवर ट्रिलर आला म्हणून शेतक-यानी 40 हजाराला बैलजोडी विकली त्याच बैलाची किंमत आज दिड ते दोन लाखा पर्यंत झाली आहे त्यामुळे ते ही परवडणारे नाही. त्यामुळे दुहेरी संकटात यंदा बळीराम सापडला आहे.
यंदा इंधन टंचाईमुळे शेतीचे भवितव्य संकटात
मुळात कोकणात दुभती जनावरे काही प्रमाणात आहेत परंतु पूर्वीसारख्या बैलजोड्या राहिलेल्या नाही. इंधन टंचाईने शेतकऱ्यांना जुने दिवस आठवत आहेत. त्यामुळे यंदाच्या शेतीचे भवितव्य संकटात असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.