Three arrested in Rs 70 lakh extortion case
जालना, पुढारी वृत्तसेवा सात संस्थाचालकांकडून ७० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या ०३ आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जेरंबद केले असून आरोपींकडून २१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
जालना शहरातील गांधी चमन येथील रहिवासी असलेले संस्था चालक रवी प्रदीप खोमणे यांचे कॉलेज आहे. त्यांनी दीप शोभा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जालना तालुक्यातील नाव्हा येथे एस. के. कॉलेज सुरू आहे. या कॉलेजमध्ये विविध अभ्यासक्रम चालवले जातात.
२४ जून रोजी रवी खोमणे यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी पथक तयार करून याबाबत कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने २४ जुन रोजी गुन्हयातील संशयित आरोपी करण विलास निकाळजे, नीलेश रावसाहेब निकाळजे (दोघे रा. तांदुळवाडी, ता. जि. जालना), मयूर कुंडलिक निकम (रा. कन्हैयानगर जालना) यांचा शोध घेऊन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हयाची कबुली देऊन गुन्ह्यातील मुद्देमाल ७ लाख ९१ हजार ५०० रुपये रोख रक्कम, गुन्हा करताना वापरलेली १० लाख रुपये किमतीची टोयोटा ग्लांजा कार, १२०० रुपये किमतीचे पिस्टलसारखे दिसणारे लायटर, खंडणीच्या पैशामधून खरेदी केलेले १ लाख ७ हजार रुपये किमतचे सोन्याचे दागिने, खंडणीच्या पैशातून खरेदी केलेला २ लाख ५ हजार रुपये किमतीचा फोटोग्राफीचा सोनी कंपनीचा कॅमेरा असा २१ लाख ४ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिस उर्वरित आरोपितांचा शोध घेत आहेत. सदर आरोर्षांना पुढील कारवाईसाठी चंदनझिरा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार रामप्रसाद पन्हरे, सॅम्युअल कांबळे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, संदिप चिंचोले, सतीश श्रीवास, देविदास भोजने, धीरज भोसले, योगेश सहाने, सोपान क्षीरसागर, चालक सौरभ मुळे यांनी केली.