This year, there is no price for cotton, which has caused financial losses to farmers.
आन्वा, पुढारी वृत्तसेवा यंदा कापसाला भावच नाही. त्यातच यंदा दोन वेचणीतच कपाशीचा सुपडासाफ झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पन्नाची आशा जागवित कपाशीची लागवड केली होती. त्यामध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. कापसाला गेल्या वर्षीही कमी भाव होते. आताही त्यापेक्षा कमी भाव आहे. त्यातच यंदा दोन ते तीन वेचणीतच कपाशीचा खराटा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
यावर्षी मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली होती. त्यात जमिनीत भरपूर ओल असल्याने उगवण शक्ती चांगली होती. मात्र, लागवडीनंतर जवळपास पंधरा दिवस पावसाने विसावा घेतल्याने पिके कोमेजून जात असताना पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र सतत काही काळ पाऊस टिकून राहिल्याने कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात तणवाढ झाली.
परिणामी विविध रोग किडीच्या मोठा प्रादुर्भाव झाल्याने पाते गळ झाली. कीड नियंत्रणासाठी महागडी तणनाशके व औषधीचे फवारणी करून कशी बशी कपाशी जगवली. दीर्घकाळ पाऊस लागून राहिल्याने भरपूर ओलाव्यामुळे मात्र पुढे कापसामध्ये सशक्त नसल्याने कापसाला हवा तसा लाग लागला नसल्याने कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात दोन ते तीन वे चणीतच कपाशीचा खराटा झाला आहे. दरम्यान, अगोदरच अतिवृष्टीत होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एकापाठोपाठ एक संकट ओढवले आहे.
वेचणी केल्यानंतर एक ते दोन वेचणीतच कपाशीचा पन्हाट्या झाला आहे. वाहन भाडे, कापूस वे चणीची मजुरी यात मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. कापसाच्या भाववाढीची दीर्घ प्रतीक्षा आहे. मात्र, योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पुरती भ्रमनिरास होत चालली आहे.
पन्हाट्या काढून गहू, हरभरा पेरणीची कामे कापूस उत्पादन घटल्याने सध्या शेतकऱ्यांचा ओढा गहू, हरभरा पेरणीकडे वाढला आहे. यामध्ये विशेष म्हणजे हरभरा पेरणीवर जास्त भर आहे.
कापसाची नासाडी
कधी नैसर्गिक आपत्ती, रोगराई, बेमोसमी पावसामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी लागलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी वेळेत मजूर न मिळाल्याने अनेकांच्या कापसाची वेचणी न केल्याने नासाडी झाली आहे.
शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका
कापसाचे उत्पादन घटले असून, रोगांचा प्रादुर्भाव, बेभरवशाचा बाजारभाव आणि घटणारे उत्पन्न ही त्यामागची कारणे आहेत. यंदा सततच्या पावसाने लाल्या, तर आता बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पहिल्या व दसऱ्या वेचणीत कापसाचा सुपडासाफ झाला आहे. - अंकुश शेळके, शेतकरी कुकडी