Weaver Bird Nest : सुगरण पक्ष्याकडून घरटी बनवण्यास सुरुवात; पावसात होतेय पिल्लांचे संरक्षण  File Photo
जालना

Weaver Bird Nest : सुगरण पक्ष्याकडून घरटी बनवण्यास सुरुवात; पावसात होतेय पिल्लांचे संरक्षण

पिल्लांसाठी तयार केलेले खोपे ठरताहेत आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

The weaver bird begins to build its nest

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा :

पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी सर्व पक्षी घरटी तयार करतात. यात सर्वाधिक आकर्षक घरटे असते ते सुगरणीचे. मोठ्या कष्टातून आखीव व रेखीव कामातून पिल्लांसाठी तयार केलेले खोपे आकर्षण ठरत आहेत.

कवी बहिणाबाई चौधरी म्हणतात, 'अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला' या ओळीची प्रचिती या खोप्यांकडे पाहून येत आहे. पक्ष्यांना पावसाळ्यात, हिवाळ्यात उबदार घरट्यांची गरज असते. ग्रामीण भागात उंच बाभळी, लिंब व बोरीच्या झाडावर दिसणारे सुगरिणीचे सुंदर घरटे वाढत्या शहरीकरणामुळे नामशेष होत आहेत.

विज्ञान युगात प्रगती केलेल्या मानवाला हाताने अथवा यंत्राच्या साहाय्यानेही सुगरिणीच्या घरट्यासारखी वीण करता येणे अशक्य असते. त्यामुळे आता मानवानेदेखील आपल्या घराच्या सजावटीत या खोप्यांचा वापर करण्यास सुरवात केली आहे. काटेरी झाडांच्या फांदीला असलेले पक्ष्यांचे घरटे साधारणतः दीड ते दोन फूट उंचीचे असते.

घरट्याच्या तळाशी प्रवेश करण्यासाठी जागा असते. आतमध्ये सहा ते आठ फूट इंच उंचावर गेल्यानंतर गोलाकार भागात अंडी घालण्यासाठी खोलगट भाग असतो. त्याच ठिकाणी पिल्ले जन्माला येतात. खोलगट भागामुळे पिल्लांना उडता येईपर्यंत बाहेर पडता येत नाही.

गवत काडीपासून तयार केलेला सुगरणीचा खोपा म्हणजे वीणकामांचा अद्वितीय नमुनाच असतो. साधारण जूनमध्ये सुगरण पक्षी घरटे तयार करतात. मध्यम, लहान आकाराचे, थव्यांनी राहणारे, लालसर पिवळ्या रंगाचे सुगरण व वीणकर पक्षी आखूड, जाडसर व टोकदार चोचीचे, तसेच लहान पायाचे असतात. धान्य, फळे हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. सद्यस्थितीत शेतशिवार हिरवाईने नटलेले आहे. ग्रामीण व शहरातील अनेक झाडांवर तयार केलेले हे खोपे पाहण्यासाठी चिमुकले व नागरिक गर्दी करीत आहेत.

पाणथळ जागेची निवड

जून महिन्यामध्ये पावसाळ्याची चाहूल लागताच, सुगरण पक्षी घरटे बांधण्यास सुरुवात करतात. सुगरण पक्षी आपल्या चोचीत गवत-पात्या गोळा करून आणि त्यांना विणून सुंदर विणीचा खोपा तयार करतात. सुगरण पक्षी घरटे तयार करण्यासाठी विशेषतः पाणथळ ठिकाणची निवड करतो. नदी काठ, विहीरी, नाले आणि बंधाऱ्याशेजारील झाडांवर अशी घरटी प्रामुख्याने दिसून येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT