The taste of rural bor is disappearing in rural areas.
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा थंडीची चाहूल लागताच जिभेवर रेंगाळणारी गोड-आंबट-तुरट गावरान बोरांची चव आता दुर्मीळ होत चालली आहे. बोरांचा हंगाम सुरू झाला असला, तरी गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातून गावरान बोरांची खास नैसर्गिक चव हळूहळू गायब होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
एकेकाळी शेताच्या बांधावर, विहिरीच्या कडेला व ओढ्यालगत सहज दिसणारी गावरान वोरांची झाडे आता दुर्मीळ झाली असून, ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला असून, गावरान बोरांची आवक अत्यंत मर्यादित आहे. बहुतांश वेळा ही बोरे केवळ संक्रांतीच्या सणापुरतीच बाज ारात दिसून येतात. ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेली ही झाडे केवळ फळ देणारी नव्हती, तर बालपणाच्या आठवणींशी घट्ट जोडलेली होती. शाळा सुटली की मुलांची टोळकी शेताकडे धाव घ्यायची. गावरान बोरे, चिंचा, करवंदे, आवळे अशा रानमेव्यावर ताव मारणे हीच त्या काळातील खरी मौज होती.
मात्र, बदलत्या काळासोबत शेतीचे स्वरूप बदलले आहे. वाढती वागायती शेती, शेतजमिनींचे सपाटीकरण, यांत्रिकीकरण आणि रासायनिक शेतीच्या वाढत्या वापरामुळे शेताच्या बांधावरील झाडे अडसर मानली जाऊ लागली. परिणामी बोरांची व चिंचेची झाडे मोठ्या प्रमाणावर तोडली गेली. याचा थेट फटका गावरान बोरांच्या अस्तित्वाला बसला आहे.
आज बाजारात इलायती किंवा सुधारित जातीची बोरे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असली, तरी त्यामध्ये गावरान बोरांची नैसर्गिक चव व सुगंध नसल्याची भावना ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. आकाराने मोठी व आकर्षक दिसणारी इलायती बोरे सहज मिळतात; मात्र गावरान बोरांच्या चवीची सर त्यांना नाही, असे जाणकारांचे मत आहे.
दुसरीकडे, रानमेवा तोडण्याची परंपराही हळूहळू लुप्त होत आहे. पूर्वी उत्साहाने रानमेव्यावर उड्या मारणारे तरुण आज मोबाइल व सोशल मीडियात अधिक गुंतलेले दिसत आहेत. रानमेवा देणाऱ्या झाडांची संख्या घटत असून, निसर्गाशी अस-लेली नाळ तुटत आहे
प्रोत्साहानाची गरज
"गावरान बोरांसोबतच बालपणाच्या आठवणीही नामशेष होत आहेत." अशी भावना घनसावंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. पर्यावरणीय समतोल राखणारी व जैवविविधतेचे प्रतीक असलेली शेताच्या बांधावरील गावरान झाडे जतन करणे, त्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि पुन्हा लागवडीला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा गावरान बोरांची चव आणि गंध केवळ आठवणींतच उरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.