The SST team seized 15 lakhs, which the taluka police returned
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अंबड रोडवरील इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ एसएसटी पथकाने वाहन तपासणीदरम्यान १५ लाख २७ हजार ९४० रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही कारवाई बुधवार दि. ७ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता करण्यात आली. जप्त करण्यात आ-लेली रोकड तालुका जालना पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली असून, चौकशी अंती ही रक्कम शेतकऱ्याची असल्याने ती परत केली असल्याचे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, जालना शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते व महामार्गावर एसएसटी पथके तैनात करण्यात आली आहेत. याच दरम्यान इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ पथक प्रमुख व्ही. आर. बोकडे यांच्याकडून एम. एच. २१ व्ही ६०९३ क्रमांकाच्या इर्टीगा वाहनाची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान वाहनात १५ लाख रुपयांची रोकड आढळून आल्याने तत्काळ ही माहिती तालुका जालना पोलिस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच पीएसआय संतोष नागरगोजे, सचिन आर्य, चतुरसिंग बहुरे, विनोद मजलकर व गाडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर सदर रोकड ताब्यात घेऊन ती तालुका जालना पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. या प्रकरणी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. रक्कम शेतकऱ्यांची असल्याने परत करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांची ३०० क्विंटल कापूस विक्री
उज्जैनपुरी येथील काही शेतकऱ्यांची ही रक्कम असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी लक्ष्मी जिनिंग येथे सुमारे ३०० क्विंटल कापूस विकला असून, त्यातून मिळालेली रक्कम घेऊन ते गावाकडे जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती इन्कम टॅक्स विभाग यांना देण्यात येणार असून, त्यांच्या तपासणीनंतरच सदर रक्कम परत करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.