

The chief election observer conducted a review
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगामार्फत नियुक्त केलेले मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनीयार आणि निवडणूक निरीक्षक हरीश धार्मिक यांनी आज जालना शहर महानगरपालिकेतील विविध निवडणूक कक्षांना भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
मुख्य निवडणूक निरीक्षकांनी सर्वप्रथम उमेदवारांना विविध परवानग्या देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षाला भेट दिली. यानंतर निरीक्षकांनी माहिती व जनसंपर्क विभाग प्रसार माध्यम कक्ष आणि माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती कक्षाची पाहणी केली.
माध्यम कक्षाद्वारे आजवर प्राप्त झालेले १० जाहिरात अर्ज आणि त्यापैकी ८ अर्जाना देण्यात आलेली परवानगी याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. दैनिक वृत्तपत्रांमधील बातम्यांचे कात्रण संकलन आणि सोशल मीडियावरील देखरेखीबाबत त्यांनी बारकाईने माहिती घेतली. आचारसंहितेचा भंग करणाऱ्या जाहिराती किंवा पेड न्यूज संदर्भात तत्काळ आणि आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी माध्यम कक्षाला दिले.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ आणि जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक प्रक्रियेच्या तयारीबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. निवडणूक यंत्रणा निर्भय आणि पारदर्शक वातावरणात काम करत असल्याची खात्री करण्यासाठी निरीक्षकांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे.
निवडणूक प्रक्रिया सुलभतेचे निर्देश
जगदिश मिनीयार यांनी परवानग्या देण्याच्या प्रक्रियेची माहिती घेऊन, उमेदवारांना कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय आणि विहित वेळेत सभा व रॅलीच्या परवानग्या मिळतील याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी यंत्रणेने तत्परतेने काम करावे, असे निर्देशही यावेळी दिले.