The number of missing women and girls has increased in the past few months at jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा : मागील काही महिन्यांपासून महिला तसेच मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे पालकांसह पोलीस प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे अगदी तरुण व वयात आलेल्या मुली देखील घरी काहीच न बोलता अचानक बेपत्ता होत असल्याने पोलिसांना देखील त्यांचा तपास करतांना मोठी अडचण येत आहे. गत वर्षी जिल्हाभरातून ७४ मुली तर यंदाच्या सहा महिन्यात ५४ मुली बेपत्ता झाल्याची पोलिस दत्परी नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, बेपत्ता महिला, मुली या ह्यूमन ट्रैफिकिंगमध्ये जात असून हा जगातील सर्वात मोठा व्यवसाय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले होते. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात 'मिसिंग सेल' स्थापन करण्यात येत असून, त्याचे नेतृत्व एपीआय दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांकडे दिले जाणार असल्याचे सांगितले होते. फुस लावून पळवून नेलेल्या मुलींचा तपास याच सेलद्वारे केला जात आहे.
महिला, मुलींसह युवक, पुरुष बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी ठाण्यांमध्ये मिसिंग सेल सुरू करण्यात आले आहेत. तेथील अधिकारी, कर्मचारी मिसिंग व्यक्तीचा शोध घेण्याचे काम करतात. दिवसेंदिवस महिला व मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान ठरत आहे. दररोज एक तरी महिला किंवा मुलगी बेपत्ता होत असल्याने हा गंभीर मुद्दा बनला आहे.
जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलींचे वेपत्ता होण्याचे प्रमाणही मोठे आहे. बेपत्ता झालेल्या मुली अल्पवयीन असतील तर पोलिसात अपहरणाची नोंद केली जाते. मुली अल्पवयीन असल्याने त्यांची ओळख जाहीर केली जात नसल्याने त्याची स्वतंत्र नोंद पोलिसांच्या संकेतस्थळावर नाही. मात्र, सज्ञान मुलींच्या बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांच्या संकेतस्थळावर आहे. बेपत्ता मुली व महिलांच्या नातेवाईकांनी जिल्हाभरातील विविध पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. घराची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये, यासाठी अनेक मुलींचे कुटुंबीय पोलिसांत तक्रार देण्याचे टाळत असल्याचेही समोर आले आहे.
पोलिस ठाण्यांत दाखल नोंदीपैकी १० टक्के तक्रारींत शोध लागत नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले जातात. इतर ३० टक्के तक्रारीतील व्यक्ती, महिला, मुलींचा शोध लागत असल्याचे दिसून येते. बेपत्ता होणाऱ्या मुलींचे वय १८ ते २५ वयोगटातील आहे.
पोलीस प्रशासनाने बेपत्ता झालेल्या महिला व मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे व त्यात चांगले यश मिळाले आहे. अधिक तर मुली ह्या प्रेमसंबंधातून असे पाऊल उचलतात, असे समोर आले आहे. आपले करिअर घडविण्याची ही वेळ आहे ही जाणीव मुलींना करून देण्यासाठी पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मोबाईल, सोशल मीडियाचा जपून वापर केल्यास यापासून मुलींना परावृत्त करण्यास मदत मिळेल. महिला देखील कौटुंबिक वादाला कंटाळून तसेच प्रेमसंबंधातूनच घर सोडून जात असल्याचे समोर येते. पालकांनी या मुलींना समजून घेवून तिला करियर संदर्भात जाणिव करुन देणे गरजेचे आहे.डिगांबर पवार, पोलिस उप निरीक्षक, पोलिस ठाणे तालुका जालना.