Jalna News : नगरपालिकेच्या निकालाने भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढणार File Photo
जालना

Jalna News : नगरपालिकेच्या निकालाने भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढणार

महापालिका, जि. प., पंचायत समिती निवडणुकांत स्वबळाची तयारी ? काँग्रेसला फटका !

पुढारी वृत्तसेवा

The municipal election results will increase the BJP's bargaining power

संघपाल वाहूळकर

जालना : रविवारी लागलेल्या नगर पालिकेच्या निकालाने जालना जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. या निवडणुकीत भाजपाने अंबड आणि परतूर नगरपालिकेवर आपले वर्चस्व सिध्द केले तर सुमारे 28 नगरसेवक निवडून आणले आहेत. यामुळे भाजप निर्विवादपणे नंबर एकचा पक्ष झाला आहे. आपली ताकद आता वाढल्याने आगामी पहिल्या टप्प्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत महापौर पद आणि एकूण वाढीव जागा यांवर भाजप दावा करणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अंबड आणि परतूरमध्ये भाजपाने स्वबळावर आपले उमेदवार उभे केले होते. यात त्यांना यश मिळाले आहे. अंबडमध्ये नगराध्यक्षासह सुमारे 14 जागा काबिज केल्या आहेत. तर परतूरमध्ये नगराध्यक्षासह 6 जागेवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. भोकरदमध्ये जरी राष्ट्रवादी शरद पवार गटाने नगरध्यक्षपद काबिज केले असले तरी भाजपाने येथे 8 जागा मिळविल्या आहेत. तर एक जागा शिवेसनेने जिंकली. येथे भाजप आणि शिवसेनेची युती होती.

आता जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधुम थांबली आहे. भाजपाने बाजी मारली. परतूर आणि भोकरदनमध्ये त्यावेळी सत्तेवर असलेला काँग्रेस पक्ष आता रसातळाला गेलेला दिसून येत आहे. या निवडणुकीत परतूरमध्ये 3 तर भोकरदनमध्ये दोन जागेवर समाधान मानावे लागले. तिच परिस्थिती शिवसेने (उबाठा)ची झाली आहे.

महायुती की स्वबळ, बैठकांच्या फैरी

जालना शहर महापालिकेची पहिलीच निवडणूक होत आहे. सुमारे 16 प्रभाग असून, एकूण 65 नगरसेवक निवडून दिले जाणार आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या महापालिकेवर आपलीच सत्ता स्थापन व्हावी, यासाठी महायुती, महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. मात्र, पहिल्या वहिली महापालिकेची निवडणूक महायुती करून लढावी की स्वबळावर उमेदवार उभे करावे, यासाठी सर्वच मित्र पक्षांच्या बैठकांच्या फैरी झडत आहे. अजूनही महायुती किंवा महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा झाली नसल्याचे चित्र आहे.

मिनी मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी लागणार चुरस

जिल्ह्यातील तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सूर जुळले नाही. याचा फटका भोकरदनमध्ये काँग्रेसला बसला. येथे काँग्रेसचे केवळ दोन उमेदवार निवडून आले. काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) या दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते माजी आदार कैलास गोरंट्याल आणि भास्कर अंबेकर यांनी अनुक्रमे भाजप आणि शिंदे सेनेत प्रवेश केल्याने फार मोठी झीज निर्माण झाली. या निकालावरून काँग्रेस आणि ठाकरे सेनेत आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. मिनी मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्ष राजकीय डावपेच आखणार आहे. यामुळे चुरस पहायला मिळणार आहे.

महाविकास आघाडी बॅकफुटवर

महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाने अंबडमध्ये 4, भोकरदनमध्ये 9, परतूरमध्ये 6 असे एकूण 19 जागांवर आपली वर्चस्व सिध्द केले. घटकपक्ष शिवसेना उबाठाने परतूर 3 तर काँग्रेसने भोकरदनमध्ये 2 आणि परतूरमध्ये 3 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी या निकालात बॅकफुटवर आल्याचे दिसून येते.

शिंदे सेना - राकाँ यांची युती

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी यापूर्वीच भाजप सोबत आली तर ठिक नाहीतर आमची युती शिंदे सेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत निश्चित असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राकाँ. अजित पवार गटानेही पालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. मंगळवार, दि. 23 पासून अर्ज ऑफलाईन पध्दतीने सादर केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT