

Former Union Minister Danve was met by the NCP district president.
भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः जालना महानगरपालिका निवडणूकीत युती करण्याच्या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. अरविंद चव्हाण यांनी रविवारी भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे यांची भोकरदन येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी चव्हाण व दानवे यांची जालना महापालीका निवडणुकीच्या विषयावर चर्चा झाली.
जालना महानगरपालिकेच्या निवडणुक प्रक्रिया सुरु झाली आहे. महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते व भाजपामधे जागा वाटपाबाबत बैठका सुरु आहेत. महायुतीतील तिसरा पक्ष राकों (अजित पवार) पक्षाशी निवडणुकीत युती करण्यासाठी भाजपाच्यावतीने चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. अरविंद चव्हाण हे रविवारी त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांसह भाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी आले होते.
यावेळी अरविंद चव्हाण यांनी दानवे यांचे जालना जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीतील विजयाबद्दल दानवे यांचे अभिनंदन केले. यावेळी जालना महापालीकेच्या जागा वाटपाबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. यावेळी अरविंद चव्हाण यांच्या सोबत राकाँ पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबासाहेब तेलगड, शेख महेमूद, मिर्झा यांची उपस्थिती होती.
जालना महापालिकेवर लक्ष
भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व राकाँचे जिल्हाध्यक्ष माजी आ. अरविंद चव्हाण यांच्यामधे जालना महापालीका निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत कोणती चर्चा झाली हे समजु शकले नाही. नगर पालीका निवडणुक निकालानंतर आता जालना महापालीका निवडणुकीवर नेत्यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.